समाजामध्ये काही एवढ्या क्रुर स्वभावाची माणसं असतात की त्यांच्यापुढे हिंस्त्र पशू देखील लाजतील, असे लोक अनेकवेळा मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देत असतात. मुक्या प्राण्यांचा विनाकारण छळ केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशा घटनांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये, कोणी कुत्र्याला कारला बांधून फरफटत घेऊन जातो, तर कोणी उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात फेकून देतो. असल्या घटना पाहून या मन सुन्न होतं तर या प्रवृत्तीच्या लोकांचा संतापही येतो.
सध्या अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी अमानूष घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एका नराधमाने नवजात कुत्र्यांच्या तीन पिल्लांना जिवंत जाळलं, तर त्यांच्या आईला विष पाजलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजन घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील चिनार पार्क येथे घडली आहे. या पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी एका कुत्रीने तीन पिल्लांना जन्म दिला होता. मात्र, एका निर्दयी व्यक्तीला कुत्रीने पार्कमध्ये पिल्लांना जन्म दिल्याचं बघवलं नाही. म्हणून त्याने या पिल्लांना जाळून मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फिरायला आलेल्या लोकांमुळे उघडकीस आली घटना –
ही घटना रविवारी सकाळी पार्कमध्ये फिरायला आलेल्या लोकांमुळे उघडकीस आली. पार्कमध्ये फिरताना काही लोकांना कुत्र्यांची ३ पिल्ले जळालेल्या अवस्थेत दिसली, तर काही अंतरावर त्यां पिल्लांची आई देखील मृत अवस्थेत असल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पशुप्रेमींना दिली.
घटनेची माहिती मिळताच पशुप्रेमी घटनास्थळी पोहचले, पण कुत्र्यांच्या पिल्लांची अवस्था पाहून धक्काच बसला. कारण, सर्व पिल्ले अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती, तर त्यांच्या आईचं शरीर पुर्ण निळं पडलं होतं. त्यामुळे आरोपीने पिल्लांच्या आईला विष पाजून मारलं असल्याचं पशुप्रेमींचे म्हणणं आहे.
हेही पाहा- Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत
दरम्यान, पशुप्रेमींचे या संपुर्ण घटनेची माहीती पोलिसांना दिली. एमपी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर अर्जरिया यांनी सांगितले की, या भागामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२९ आणि प्राणी क्रूरता कायदा कलम १३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्यांना अमानुषपणे जाळणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र, या घटनेमुळे माणसातील पशूता समोर आल्याचं अनेक पशुप्रेमींनी म्हटलं असून अनेकांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली.