Viral Video : तुमच्यातील अनेकजण प्राणीप्रेमी असतील. रस्त्यावर एखादा प्राणी दिसला की, तुम्ही त्याला मायेनं कुरवाळतात, त्यांना काहीतरी खाऊ घालतात आणि काहीजण तर अगदी त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जातात. बऱ्याचदा तुमच्यातील अनेकजण पाळीव प्राण्यांना कुटुंबातील एक सदस्यच मानतात. त्यांच्यासाठी कपडे, फिरायला घेऊन जायला बॅग, पायात घालायला बूट आणतात. पण तुम्ही कधी मांजरीसाठी भिंतीमध्ये घर तयार केलेलं पाहिलं आहे का ? स्पेनमध्ये एका स्ट्रीट आर्टिस्टने मांजरीसाठी भिंतीमध्ये चित्र रेखाटून घर तयार केलं आहे .
अरुंद गल्ल्यांमध्ये भिंतीमध्ये एक खास रचना करण्यात आली आहे. एका भिंतीची रचना एखाद्या घराप्रमाणे केली आहे. भिंतीवर घराची कौले, दोन्ही बाजूने अनेक विटा तसेच पाच खिडक्या, गॅलरी, दरवाजा आणि एक छोटं बेसिन देखील भिंतीवर तयार करण्यात आले आहे.हे खास घर एका मांजरीसाठी तयार करण्यात आलं आहे. तसेच मांजरीला आतमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा देखील बनवला आहे. भिंतीवर रेखाटण्यात आलेली कला चित्रासारखी दिसत असली तरीही अगदीचं खऱ्याखुऱ्या घराप्रमाणे त्यावर काम केलं आहे. तसेच व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, घरात मांजरीला प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ‘दरवाजा’ तयार केला आहे. स्थानिक मांजरीसाठी तयार करण्यात आलेलं खास घर एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं..
व्हिडीओ नक्की बघा :
मांजरीसाठी तयार केलं खास घर :
व्हायरल होणार हा व्हिडीओ स्पेनमधील आहे. स्पेनमधील स्थानिक मांजरीसाठी असे खास घर डिझाईन केलं आहे. स्पेनमध्ये भिंतीमध्ये चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचे नाव ‘अल्फोन्सो युस्टे नवारो’ असून हे एक स्ट्रीट आर्टिस्ट (Street Artist) आहेत. तसेच हे अनेकदा व्हॅलेन्सियाच्या (Valencia) रस्त्यांवर स्थानिक मांजरींसाठी अशी खास घरे तयार करत असतात.
सोशल मिडियावर हा व्हिडीओ @Rainmaker1973 या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात असून, ‘अल्फोन्सो युस्टे नवारो’ हा स्पेनमधील स्ट्रीट आर्टिस्ट आहे. ते व्हॅलेन्सियाच्या रस्त्यांवर स्थानिक मांजरींसाठी अशी घरे बनवतात ; असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण ‘कौशल्याचा खूप चांगला उपयोग केला ‘, ‘प्रत्येक शहरात असे करण्यात यावे’ अशा कमेंट नेटकरी करताना दिसून येत आहेत. तसेच अनेकजण कलाकाराच्या रचनेचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत