आपल्यापैकी अनेकांना झोपेत भयानक स्वप्न पडली असतील पण ‘स्वप्न ही स्वप्न असतात ती काही खरी होत नसतात’ असं म्हटलं जात. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, झोपेत पडलेल्या भयंकर स्वप्नांना कटांळून एका शेतकऱ्याने जोतिष्याचा सल्ला घेतला आणि जोतिष्याच्या सल्ल्यामुळे त्याला आपला आवाज गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील इरोड येथे घडली आहे. तेथील राजा नावाच्या शेतकऱ्याला सतत भयंकर स्वप्न पडत होती. स्वप्नामध्ये त्याला सापाने चावल्याचं स्वप्न सतत पडायचं. रोज पडत असलेल्या भयंकर स्वप्नांच्या भीतीमुळे त्याने एका ज्योतिष्याचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
हेही वाचा- ‘मैं नही तो कौन बे’, आरशात स्वतःला पाहून माकडाने सुरु केलं भांडण अन् पुढं जे झालं…
त्यानुसार त्याने त्याच्यासोबत होत असलेल्या घटनेबद्दलची सर्व हकीकत ज्योतिषाला सांगितली. त्यानंतर ज्योतिषाने शेतकऱ्याला सर्प मंदिरात जाऊन या वाईट स्वप्नांपासून सुटका करण्यासाठीचा एक विधी करण्यास सांगितला. त्यानुसार शेतकऱ्याने सर्प मंदिरात जाऊन विधी करायला सुरुवात केली. पण धक्कादायक बाब म्हणजे या विधीमधील एक कृती ही स्वप्नांपेक्षा भयानक होती आणि ती कृती करणंच शेतकऱ्याचा आवाज जाण्यास कारणीभुत ठरली आहे.
विधीमुळे गमावला आवाज –
सर्प मंदिरात गेल्यावर ज्योतिषाने विधीचा एक भाग म्हणून शेतकऱ्याला चक्क सापासमोर त्याची जीभ तीन वेळा बाहेर काढायला सांगितली आणि त्याचवेळी सापाने शेतकऱ्याच्या जीभेचा चावा घेतला. साप चावताच शेतकरी मोठमोठ्याने ओरडू लागला. स्थानिक नागरिकांनी त्याला इरोडमधील मणियन मेडीकल सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत खूप वेळ झाला होता. कारण, उपचारानंतर तो शेतकरी बोलू शकत नाहीये. शिवाय त्याला आता कधीच बोलता येणार नाही असं देखील बोललं जात आहे.