दररोज ऑफिसला फॉर्मल किंवा जीन्स घालून जाणाऱ्या तरुणी, महिलांना सणांनिमित्त खास तयार व्हायला मिळते. त्यातच नवरात्रीत या सणादरम्यान त्यांना नऊ दिवस विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची आणखी एक संधी मिळते. आज नवरात्रीचा सहावा दिवस असून, आजचा रंग हिरवा आहे. सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला व तरुणी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि हिरव्या रंगाने विरार रेल्वेस्थानक सजलेले पाहायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओ रेल्वेस्थानकाचा आहे. सगळ्या स्त्रिया व तरुणी ट्रेनची वाट बघत उभ्या आहेत. कदाचित त्या लेडीज स्पेशल ट्रेनची वाट बघत आहेत. कारण- रेल्वेस्थानकावर स्त्रियांची जास्त गर्दी दिसते आहे. तसेच मुलींपासून ते तरुणींपर्यंत सर्वांनी हिरव्या रंगाचा पोशाख घातला आहे; जो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. काही स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या साड्या, मुलींनी ड्रेस, जीन्स वा टॉप आणि कुर्ता घातला आहे, असे व्हिडीओत दिसून येत आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सगळेच हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून आले आहेत. नवरात्री स्पेशल विरार रेल्वेस्थानकाचा हा खास व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
विरार रेल्वेस्थानक सजले हिरव्या रंगाने :
विरार हे नेहमीच गजबजलेले रेल्वेस्थानक असते. विरार हे पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे लोकल, एक्स्प्रेस, मेलमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची इथे वर्दळ पाहायला मिळते. आज नवरात्रीनिमित्त येथे अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. या स्थानकावर तरुणींपासून ते स्त्रियांपर्यंतची रांग लागली आहे आणि सगळ्यांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हिरवा गडद रंग, शेवाळ, पोपटी अशा अनेक हिरव्या रंगांचे मिश्रण या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने या याआधी नवरात्रीच्या पाचही दिवसांचे व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर @siddronebaba आणि @rakshashetty यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘गो ग्रीन (Go Green) नवरात्रीचा सहावा दिवस’ असा या व्हिडीओवर मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये कात्यायनी देवी आणि हिरव्या रंगाचे महत्त्व सांगणारी माहिती युजरने दिली आहे. नवरात्रीचा सहावा दिवस हा हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याचा दिवस मानला जातो. तसेच नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. हिरवा रंग समर्पण व इच्छाशक्ती दर्शवतो; तसेच हा रंग शांततादेखील दर्शवतो, असे युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.