विमानाने प्रवास करायचा असेल तर पासपोर्ट आवश्यक आहे पण हा नियम फक्त माणसांसाठीच आहे असे नाही. सौदी अरेबियात बहिरी ससाण्याला देखील पासपोर्ट अनिवार्य आहे. ‘दुबई वेन्स’ नावाच्या एका फेसबुक पेजवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यात एक अरब माणूस विमानतळावर आपल्या ससाण्याला घेऊन उभा आहे. केवळ उत्सुकता म्हणून एका परदेशी व्यक्तीने या अरब माणसाला विचारले असता हा ससाणा आपल्यासोबत विमानाने प्रवास करणार असल्याचे त्याने सांगितले. या परदेशी व्यक्तीला सुरूवातील धक्का बसला पण सौदी अरेबियातील श्रीमंत व्यक्ती विमानात आपल्या ससाण्याला सोबत नेऊ शकतात असेही या अरब व्यक्तीने सांगितले इतकेच नाही तर अरब व्यक्तींकडे असणा-या प्रत्येक ससाण्याचा पासपोर्ट असतो असेही तो म्हणाला . ‘फाल्कन पासपोर्ट’ असे इंग्रजी आणि उर्दु भाषेत त्यावर लिहले असते अशीही माहिती त्यांनी दिली.
सौदीमध्ये अनेक श्रीमंत व्यक्तींकडे बहिरी ससाणा असते. ब-याचदा परदेशातून लाखो रुपये मोजून हे पक्षी विकत घेतले जातात. त्यामुळे ससाणा बाळगणे हा अनेक सौदी पुरूषांचा छंद असतो. बहिरी ससाण्याचे अनेक खेळही येथे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ससाण्याचा मालक जर देशाबाहेर या पक्ष्याला घेऊन जात असेल तर त्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. विना पासपोर्ट ससाणा हा देशाबाहेर जाऊ शकत नाही. या पासपोर्टवर ससाणा कुठून आणला, त्याच्या मालकाचे नाव, पत्ता अशी बरीच माहिती लिहिली असते. ससाण्याची तस्करी थांबावी यासाठी हा पक्ष्याचा पासपोर्ट बाळगण्याचा नियम अनिवार्य करण्यात आला आहे.

Story img Loader