सोशल मीडियावर सध्या एका पोलिसाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल यात शंका नाही. कारण या पोलिसाला तो वापरत असलेल्या रायफलमध्ये गोळी कुठून घालायची असते याचीच माहिती नसल्याचं उघडकीस आलं आहे. अधिकारी या पोलिसाला त्याची रायफल लोड करायला लावतात, तो प्रसंग खूप गमतीशीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे.
उत्तर प्रदेशातील पोलिसांची चर्चा सोशल मीडिया सतत होत असते. ज्यामध्ये त्यांनी कधी कुख्यात गुन्हेगारांचा केलेला एन्काउंटर तर कधी तोंडातून मोठे आवाज काढून चोरांना पळवल्याचे किस्से असोत ते सतत व्हायरल होत असतात. मात्र, सध्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा (SI) असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल आणि पोलिसांत अशा लोकांची भरतीच का केली? असा प्रश्नही तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांतील एका उपनिरीक्षकाला त्याच्या अधिकाऱ्यासमोर रायफलमध्ये गोळी घालता आली नसल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना नोकरीवर रुजू करताना प्रशिक्षण दिले जाते. तरीही या उपनिरीक्षकाने रायफलच्या ज्या नळीतून गोळी बाहेर फेकली जाते त्याच नळीत गोळी घातल्याचं पाहून हसू आवरण कठीण झालं आहे.
व्हिडीओत वरिष्ठ अधिकारी या पोलिसाला टीयर गन ऑपरेट करायला सांगतात. त्यावेळी पोलिस बंदुक हातात घेतो आणि गोळी थेट रायफलच्या नळीमध्ये घालतो आणि ती गोळी लगेच खाली पडते आणि तरीही हा पोलिस रायफल चालवताना दिसतं आहे. मात्र, रायफलमध्ये गोळीच नसल्याने केवळ टिक-टिक असा आवाज आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यूपी पोलिसांना खूप ट्रोल केलं आहे.
हेही पाहा- बिबट्याचा ‘हा’ अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच
रायफलच्या नळीतच घातली गोळी –
डीआयजींनी पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना त्याच्याजवळ असलेली शस्त्र चालवण्यास सांगितले. यावेळी त्यांनी एका पोलिसाला त्याच्याजवळची टीयर गन ऑपरेट करायला सांगितली. धक्कादायक बाब म्हणजे या पोलिसाला तो वापरत असलेली रायफल कशी चालवायची हेच माहिती नसल्याचं उघडकीस आलं. यावेळी पोलिसाने ज्या नळीमधून गोळी बाहेर येते तिथून गोळी आत घालण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओत दिसतं आहे.
या पोलिसाची अवस्था पाहून डीआयजींनी डोक्याला हात लावला. बंदूका, रायफलवर पोलिसांची चांगली कमांड असायला हवी, कारण संकटाच्या वेळी पोलिसांना त्यांची गरज असते. पण सरावादरम्यानच पोलिसांना रायफल चालवता येत नसेल तर संकटाच्या परिस्थितीत ते काय करणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीआयजी आरके भारद्वाज यांनी सांगितलं की ‘जवानाला रायफल हाताळता येत नाही. त्यामुळे त्याचा आपत्कालीन परिस्थितीत जीवही जाऊ शकतो. शिवाय ज्या काही त्रुटी आढळल्या, त्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे झाल्या आहेत. जवानांमध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही दुरुस्त करुन घेऊ’ असं डीआयजी म्हणाले.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या घटनेचा व्हिडीओ ममता त्रिपाठी नावाच्या महिलीने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘धन्यवाद यूपी पोलिस. संतकबीर नगरमधील SI ला रायफल कशी चालवायची माहिती नाही. नळीतूनच गोळी कशी घालायची तेही कळत नाही. डीआयजी आरके भारद्वाज यांना खलीलाबाद पोलीस ठाण्यात हा नमुना पाहायला मिळाला. अशा पोलिसांमुळे गुन्हेगारांना भीतीपोटी राज्यातून पळ काढावा लागत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरण कठीण आहे.’ तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, ‘हे सर्व पाहून हसावं की रडावं कळत नाहीये.’