Viral Video : बॉलीवूडचा किंग खान आणि सगळ्यांचा आवडता अभिनेता ‘शाहरुख खान’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर फक्त शाहरुख खानवर प्रेमाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. गोपाळकालाच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय; तर अशातच आता शाहरुख खानच्या एका चाहत्याने पांढऱ्या संगमरवरी खडकांपासून एक पोट्रेट बनवले आहे.
एका बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन तरुणाने हे खास पोट्रेट तयार केले आहे. रुंद जागेत निळ्या रंगाचा कागद टाकण्यात आला आहे आणि त्यावर ब्रशच्या सहाय्याने पांढऱ्या रंगाने बाह्यरेखा काढून घेतली आहे तसेच आतमध्ये पांढऱ्या संगमरवरी लहान खडकांच्या मदतीने शाहरुख खानचे चित्र काढण्यात आले आहे आणि अशा प्रकारे शाहरुख खानचे पोट्रेट तरुणाने तयार केले आहे. तसेच तरुण शाहरुख खानची सिग्नेचर स्टेप करत, पूर्ण पोट्रेटची ड्रोनच्या सहाय्याने झलक दाखवतो. संगमरवरी लहान खडकांपासून तयार केलेलं सुंदर पोट्रेट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा…१९९४ नंतर शाहरुख खानने ‘जवान’ मध्ये ‘ती’च्यासह पुन्हा शेअर केली स्क्रीन; मानधन ऐकून व्हाल थक्क
व्हिडीओ नक्की बघा :
कलाकाराने संगमरवर खडकांपासून साकारले खास पोट्रेट :
जवान चित्रपटनिम्मित शाहरुख खानचे चाहते विविध माध्यमातून सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. काही जण खास व्हिडीओ बनवत आहेत, तर काही जण असे सुंदर पोट्रेट बनवत आहेत आणि शाहरुख खानवरील आपले प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत. शाहरुख खानचे पोट्रेट तयार करणारा तरुण इन्स्टाग्रामवर एक कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या कलाकाराचे नाव प्रीतम बॅनर्जी असे आहे. कलाकाराने ३० फुटांचे हे अनोखे पोट्रेट शाहरुख खानसाठी तयार केले आहे; जे पाहून तुम्हीसुद्धा चकित व्हाल.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @bongpicasso तरुणांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून लिहिले की, “किंग खान @iamsrk” ! पांढऱ्या संगमरवरी खडकांच्या मदतीने शाहरुख खानसाठी हे पोर्ट्रेट बनवले आहे; ज्याचा आकार अंदाजे ३० फूट असेल. शाहरुख खानवर माझं जे प्रेम आहे, ते या कलेच्या पलीकडे आहे. मला इच्छा आहे की, त्याने हे पाहावं; अशी इच्छा तरुणाने कॅप्शनमधून व्यक्त केली आहे. तसेच तरुणाने एक महिन्यापूर्वी हे पोट्रेट तयार करून ठेवले होते आणि तेव्हापासून हा तरुण हे खास पोट्रेट पोस्ट करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत होता आणि ‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने ती योग्य वेळ आली असे तरुणाला वाटले; म्हणूनच त्याने शाहरुख खानसाठी तयार केलेलं पोट्रेट सोशल मीडियावर शेअर केले आणि हे पोट्रेट पाहून अनेक जण व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच कलाकाराच्या कल्पनेचं आणि रचनेचं कौतुक करताना कमेंटमधून दिसून आले आहेत.