Viral Video :- शाळा ही प्रत्येकासाठी खास असते. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं अनोखं नातं शाळेदरम्यान आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवण्यापासून ते तुमच्या वाईट गोष्टींवर ओरडण्यापर्यंत शिक्षक नेहमीच त्यांची उत्तम कामगिरी बजावताना दिसून येतात. शाळेत शिक्षक एखाद्या गोष्टीवरून ओरडायचे किंवा छडी मारायचे, तेव्हा त्या गोष्टीचा आपण खूप राग धरून बसायचो; पण कालांतराने याच गोष्टी आठवल्या की, त्या तुमच्या चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जातात. शाळा सोडून अनेक वर्षं झाली तरीही अनेक विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शाळेतील मित्रांना, शिक्षकांना विसरत नाहीत. ते त्या शिक्षकांची आवर्जून भेट घेताना दिसून येतात. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओतही असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. या व्हिडीओत सर्व अधिकारी मित्र त्यांच्या शिक्षिकेला भेटायला गेले होते .
सोशल मीडियावरील या व्हिडीओत सर्व आयएएस (IAS), आयएफएस (IFS) व आयपीएस (IPS) अधिकारी त्यांच्या शाळेतील कडक शिस्तीच्या शिक्षिकेला भेटायला गेले होते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अनेक मंडळी जमली आहेत.आणि ते सर्व आयएएस, आयएफएस व आयपीएस अधिकारी आहेत. हे सर्व अधिकारी शिक्षिकेसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांच्या शाळेतील शिक्षिका हातात छडी घेऊन उभी आहे. तसेच पुढे व्हिडीओत अधिकाऱ्यांपैकी दोघांच्या हातावर शिक्षिका छडी घेऊन मारताना दिसत आहे. छडीने मारताच त्या दोन्ही अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि ते कृतज्ञतापूर्वक शिक्षिकेच्या पाया पडताना दिसत आहेत. अधिकारी मित्रांना हा क्षण शाळेतील दिवसांची आठवण करून देत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगतोय. हा अविस्मरणीय व हृदयस्पर्शी क्षण तुमच्याही चेहऱ्यावर नकळत आनंद निर्माण करील आणि तुम्हालाही पुन्हा शाळेच्या आठवणींत घेऊन जाईल. त्यामुळे नक्की बघा हा व्हिडीओ.
हेही वाचा :- “गुन्हे थांबवायला हिंदू पंचांग वापरा”, पोलीस महासंचालकांचा आदेश; अमावस्येच्या तारखांनुसार सांगितलं लॉजिक
व्हिडीओ नक्की बघा :-
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ ट्विटरवरून (Harsha Patel ) यांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सर्व आयएएस, आयएफएस व आयपीएस अधिकारी त्यांच्या शाळेतील कडक शिक्षिकेला भेटायला आले होते. किती अविस्मरणीय व हृदयस्पर्शी क्षण, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक प्रेक्षक ‘चांगल्या शिक्षिका नेहमीच विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात’, असं म्हणत आहेत. तर अनेकांना हा व्हिडीओ बघून शाळेचे दिवस आठवले आहेत; तर अनेक जण त्यांच्या शब्दांत विविध भावना व्यक्त करताना कमेंटमधून दिसत आहेत.