Viral video : आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. विविध फ्लेवर आणि वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या आईस्क्रीम दुकानात सर्वत्र उपलब्ध असतात; पण तुम्ही कधी आईस्कीम कसं बनवलं जातं हे पाहिलं आहेत का? तर हा इन्स्टाग्राम व्हिडीओ तुम्हाला आईस्क्रीम बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाणार आहे, ज्यात व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवलं जातं याची एक छोटी झलक दाखवण्यात आली आहे.
सुरुवातीला फॅक्टरीतील कामगार दुधाच्या पॅकेटने भरलेले ट्रे सरकवताना दिसत आहे. त्यानंतर एका लाल भांड्यात जास्त प्रमाणात साखर आणि मिल्क पावडर ओतली जात आहे; तसेच हे करताना कामगार हातमोजे वापरतानासुद्धा दिसून येत आहे. नंतर कामगार अमूल दुधाची पॅकेट घेतो आणि मिक्सिंग मशीनमध्ये दूध ओतून रिकामी करतो. यानंतर मिश्रणात पूर्व-मिश्रित साखर आणि दुधाची पावडर मिसळली जाते. तसेच वेगळ्या कंटेनरमध्ये फ्रेश क्रीम आणि साखर यांचे मिश्रण काळजीपूर्वक मिसळले जाते आणि नंतर त्याला गाळून घेतले जाते. व्हिडीओच्या अगदी शेवटी मिक्स करण्यात आलेल्या मिश्रणात व्हॅनिला एसेन्स मिसळले जात आहे. यानंतर मिश्रण मशीनमध्ये टाकले जाते आणि ताजे आणि मलईदार व्हॅनिला आईस्क्रीम बाहेर येताना तुम्हाला दिसेल.
हेही वाचा… VIDEO : बापरे! विमान चक्क समुद्रात कोसळलं, लोकं सैरावैरा पळत सुटले; पाहा, अंगावर काटा येणारा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
अनेक ब्लॉगर, इन्फ्लुएंसर विविध पदार्थ कसे तयार केले जातात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, त्याच यादीत आता ‘व्हॅनिला आईस्क्रीम’ बनवण्याचा व्हिडीओदेखील जोडला गेला आहे. फूड ब्लॉगर हर्ष सहगलने व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्याची एक झलक त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओद्वारे दाखवली आहे, जी अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @delhifoodie या फूड ब्लॉगरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून : ‘व्हॅनिला आईस्क्रीम फॅक्टरीत बनवताना’ असे या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्याची पद्धत खूपच आवडली आहे. तसेच काही जण, ‘अमूल दुधापासून व्हॅनिला आईस्क्रीम बनवले जाते’ हे पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच काहींना व्हॅनिला फ्लेवर आवडतो, म्हणून ‘माझं प्रेम’ या शब्दात व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया देत आहेत; तर अनेक जण आईस्क्रीम बनवणाऱ्या कामगारांची स्वच्छता पाहून त्यांना पैकीच्या पैकी मार्क देताना दिसून आले आहेत.