IND vs AFG Viral Video: भारताचा स्टार फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात तब्बल १०२० दिवस म्हणजेच जवळपास तीन वर्षांंनी पहिले शतक लगावले आहे. आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यात कोहलीची बॅट तळपल्यावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक साकारले. यानंतर जगभरातून किंग कोहलीवर कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यामध्ये एका वृद्ध क्रिकेटप्रेमींचा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे
आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की शतकी खेळीनंतर आनंद साजरा करताना विराट प्रेक्षकांकडे बॅट फिरवून आभार मानत आहे तर त्याच्या अगदी मागेच एक क्रिकेटप्रेमी ज्येष्ठ नागरिक खाली वाकून विराटला नमस्कार करत आहेत. खरंतर विराटचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही पण अगदी निरागस असा हा क्षण पाहून नेटकरी सुद्धा भावुक झाले आहेत. विराटला ट्रोल करणाऱ्यांमध्ये हे एक आजोबा त्यांच्या इवल्याश्या कृतीने आभाळाएवढं कौतुक माजी कर्णधाराच्या पदरी टाकून गेले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
स्पर्धेतील भारताच्या अंतिम सामन्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने, कर्णधार केएल राहुल (41 चेंडूत 62) आणि कोहलीने सुरुवातीच्या विकेटसाठी ७६ चेंडूत ११९ धावांची भागीदारी केली. कोहलीने डावाच्या अखेरीस अफगाणी गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. तर दुसरीकडे दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून राहुलची खेळी ही त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरली.
कव्हर ड्राइव्ह, पूल आणि फ्लिक यांसारख्या फटक्यांचा नजराणा पेश करताना कोहलीने ६१ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्याने नाबाद १२२ धावांची खेळी केली. नोव्हेंबर, २०१९ पासून (बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत १३६ धावा) हे त्याचे पहिले शतक ठरले.