World Cup 2023 Final Special Train: सध्या संपूर्ण देशात आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ (World Coup 2023 Final Match) ची धूम पाहायला मिळतेय. भारताने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, त्यामुळे संपूर्ण देश आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रविवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा अंतिम सामना होणार असून तो गुजरातच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी ते अहमदाबाददरम्यान विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) वर या ट्रेनसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते अहमदाबाददरम्यान धावणार आहे. तसेच सामना संपल्यानंतर पुन्हा ही ट्रेन अहमदाबादहून सुटेल आणि सीएसएमटीला पोहोचेल. या विशेष ट्रेनची तिकीट बुकिंग १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरु होईल.
वर्ल्डकप फायनलसाठी मुंबई ते अहमदाबाद स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
मध्य रेल्वेतर्फे चालवली जाणारी क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन (01153) १८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून अहमदाबादसाठी रवाना होईल. यावेळी ती दादर, ठाणे, वसईमार्गे गुजरातमधील सुरत, वडोदरा येथून अहमदाबादला दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. यानंतर सामना संपल्यानंतर क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन (01154) अहमदाबाद येथून २० नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १०.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.