Viral video: क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. अनेक तरुणांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असतं. अगदी नुकतंच जन्माला आलेल्या बाळाच्याही हातात हल्ली बॅट दिली जाते. जन्मता:च त्यांना क्रिकेट खेळायची आवड निर्माण होते ती नंतर कितीही मोठे झाले तरी क्रिकेट काही सुटत नाही. त्यात गल्ली बोळात खेळणाऱ्या मुलाचंही भारताच्या टीममध्ये खेळायचं स्वप्न असतं. मात्र ते सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये सरफराज खानने कसोटी संघात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच सामन्यात जबरदस्त खेळी करत ६२ धावा केल्या. इथपर्यंत पोहोचण्यासाठी सरफराज आणि वडील नौशाद खान यांनी बरीच मेहनत घेतली होती. मैदानात टीम इंडियाची कॅप परिधान केल्यानंतर नौशाद खान यांना अश्रू अनावर झाले. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत सरफराज खान याच्या वडिलांना मोठी ऑफर दिली आहे.
सर्फराज आणि त्याच्या वडिलांचा नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. सर्फराजला त्याची कसोटी कॅप मिळाल्यानंतर त्याचे वडील खूप भावूक झाले होते. त्यांना त्यांचे अश्रूही थांबवता आले नाही. सर्फराजसाठी त्याच्या वडिलांनी घेतलेली मेहनत, त्यांचे कष्ट अन् जिद्द याची क्रिकेट वर्तुळाला भुरळ पडली. अशातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांचे कौतुक करताना एक मोठे विधान केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नौशाद खान यांना थार भेट देणार असल्याचे सांगितले.
नक्की काय म्हणाले आनंद महिंद्रा ?
आनंद महिंद्रा यांनी म्हटले, “हिंमत सोडायची नाही, कठीण परिश्रम, धाडस आणि संयम. मुलाला प्रेरणा देण्यासाठी वडिलांमध्ये आणखी कोणते चांगले गुण असायला हवेत? एक प्रेरणादायी वडील म्हणून नौशाद खान यांनी माझ्याकडून थारची भेट स्वीकारली तर तो माझा बहुमान आणि सन्मान असेल.”
पाहा पोस्ट
हेही वाचा >> फूटपाथ, भरधाव कार अन् मृत्यू; इतकी भयंकर धडक की तरुणाचा जागीच गेला जीव! धक्कादायक VIDEO समोर…
काय म्हणाले होते सर्फराजचे वडील?
“प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलानं देशासाठी खेळावं. माझं सुद्धा हे स्वप्न होतं पण ते पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. मला माहीत होतं की त्यासाठी वेळ लागेल. मी अनेकांना पाहिलं त्यापैकी काहींना लवकर यश मिळालं तर काहींना खूप वाट पाहावी लागेल.” यानंतर सर्फराजने दिलेल्या प्रतिक्रियेत तो म्हणतो, “रात्र संपायला वेळ लागतोच, तसे माझ्या इच्छेनुसार सूर्य उगवणार नाही हे सुद्धा खरं” सर्फराजचे हे शब्द त्याचा संघर्ष आणि संयम दाखवतो.
आनंद महिंद्रा यांनी असं ट्वीट करताच या व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या सौजन्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.