मागील काही वर्षांमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना इतका रंजक आणि रोमांचक कधीच झाला नसेल अशा प्रतिक्रिया टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सामन्यानंतर व्यक्त केल्या जात आहेत. अगदी शेवटच्या क्षणी निर्णय लागलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून ३०० हून अधिक धावा केल्या. मात्र या सामन्याचा खरा हिरो ठरला तो विराट कोहली. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. या विजयानंतर सोशल मीडियावरुन विराटवर आणि भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच या सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी एका विमानाचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झालं असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण असं मुंबई विमानतळावर खरोखरच घडल्याचा प्रसंग एका अभिनेत्यानेच सांगितलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या विजयानंतर काही तासांनी अभिनेता अयुष्मान खुरानाने ट्वीटरवर तीन ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना मला सांगता येईल. मी भारत पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई-चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांच्या स्मार्टफोनला चिटकून असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला. आणि विशेष म्हणजे कोणीही याबद्दल तक्रार केली नाही,” असं आयुष्मानने म्हटलं आहे.

सामान्यपणे विमान उड्डाण करताना ते रनवेवर धावण्यास सुरुवात करण्याआधीच प्रवाशांना स्मार्टफोन, टॅब बंद करण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र आयुष्मानने हे विमान धावपट्टीवर धावू लागलं अन् टेक ऑफच्या अगदी काही क्षण आधी सर्वच प्रवाशांनी हात उंचावून आरडाओरड करत विजयाचा जल्लोष साजरा केल्याचं म्हटलं आहे. “पंड्या आणि दिनेश कार्तिक बाद झाले. त्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला. त्याने आरामात वाईड बॉल सोडून दिला. अंतिम धाव त्यानेच घेतली. मी यापूर्वी कधीच विमानामध्ये अशाप्रकारचा एकाच वेळी केलेला जल्लोष पाहिला नाहीय. आमचं विमान रनवेवर धावण्यासाठी तयार असतानाच हे सारं घडलं. वैमानिकानेही अचूक टायमिंग साधलं,” असं दुसऱ्या ट्वीटमध्ये आयुष्मानने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

“मी हे रेकॉर्ड करु शकलो असतो तर किती बरं झालं असतं असं वाटलं. मात्र मला एक मान्य करावं लागेल की अशा गोष्टी सार्वजनिक आयुष्यात करायला मला अवघडल्यासारखं होतं. मला तो क्षण जगायचा होता. विराट कोहली आणि भारतीय संघाचे मी आभार मानतो त्यांनी एक दिवस आधीच देशाला दिवाळी साजरी करण्याची संधी दिली,” असंही आयुष्मानने शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: अनुष्का शर्माच्या ‘त्या’ पोस्टला ४७ लाखांहून अधिक Likes; विराट कोहली ही कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक क्षणी माझ्या…”

आयुष्मानने शेअर केलेल्या या अनुभवाचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

शेवटच्या षटकामधील थरार
विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak mumbai chandigarh flight deliberately delayed by 5 mins to watch last 2 overs of t 20 world cup match tweets actor ayushmann khurrana scsg