झिम्बाब्वेचा पराभव करून भारताने एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केली आहे. भारतीय संघाने या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १३ धावांनी जिंकला. भारताने झिम्बाब्वेसमोर २८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र ४९.३ षटकांमध्ये अवघ्या २७६ धावा करून विरुद्ध संघ गारद झाला. भारताच्या वतीने शुभमन गिलने १३० धावांची खेळी खेळली, तर झिम्बाब्वेकडून सिकंदर रजा याने ११५ धावा केल्या.
मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान, धवनने काळा चष्माही लावला आहे. यासोबतच केएल राहुल, ईशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाडही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी
या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू धमाल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही अशा प्रकारे विजय साजरा करतो. हॅशटॅग काला चष्मा.’ यामध्ये त्याने चष्मा लावलेला इमोजीही लावला आहे. धवन स्वतः पार्टी स्टार्टर होता. त्याच्यासोबत कर्णधार केएल राहुल सेलिब्रेशन करताना दिसला. झिम्बाब्वेला या मालिकेत हरवल्यानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष केला. त्यांचा आनंद साजरा करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
IND vs ZIM: राष्ट्रगीत सुरू असताना मधमाशीने केला ईशान किशनवर हल्ला; बघा काय होती त्याची रिअॅक्शन
सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी केल्यानंतर तिसऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताचे सलामीवीर कर्णधार केएल राहुल (३०) आणि शिखर धवन (४०) यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली, पण ब्रॅड इव्हान्सने दोन्ही सलामीवीरांची रवानगी पॅव्हेलियनमध्ये केली. यानंतर शुभमन गिल (१३०) आणि ईशान किशन (५०) यांनी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली. गिलने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यामुळेच भारताला ५० षटकांत ८ बाद २८९ धावांपर्यंत मजल मारता आली.