PM Modi Speech 2023 : देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून १० व्यांदा देशातील देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी आज ९० मिनिटांचे भाषण केले. देशातील सर्वात मोठे भाषण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. याआधी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी जवळपास ८३ मिनिटं भाषण केले होते. तर २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी ८६ मिनिटांचे भाषण करुन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सर्वात लांब भाषणाचा विक्रम मोडीत काढला होता. यामुळे मोदींनी लाल किल्ल्यांवरून दिलेल्या आत्तापर्यंतच्या भाषणाबाबतच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊ…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून १० वेळा देशातील जनतेला संबोधित केले. पण त्यांच्या कारकिर्दीत फक्त एकदाच त्यांनी एक तासापेक्षा कमी वेळेचे भाषण केले होते.
२०१७ मध्ये स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी केवळ ५६ मिनिटांचे भाषण केले होते. हे त्यांचे आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात लहान भाषण होते. यापूर्वी २०१६ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांनी ८६ मिनिटांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडीत काढत तब्बल ९४ मिनिटांचे भाषण करुन एक नवा रेकॉर्ड रचला.
कोणत्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी किती मिनिटे भाषण केले?
२०१४ साली लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केले, तेव्हा त्यांनी एकून ६५ मिनिटे भाषण केले, त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी ८६ मिनिटे देशाला संबोधित केले. यानंतर २०१६ मध्ये देश स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन साजरा करत असताना मोदींना लाल किल्ल्यावरून जवळपास ९४ मिनिटे देशाला संबोधित केले, पंतप्रधान पदाच्या त्यांच्या कार्यकाळातील लाल किल्ल्यावरील हे सर्वात मोठे भाषण होते.
यानंतर २०१७ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी ५७ मिनिटे, २०१८ मध्ये ८२ मिनिटे आणि २०१९ मध्ये ९२ मिनिटे देशाला संबोधित केले.
यानंतर २०२० मध्ये मोदींनी लाल किल्ल्यावरून ८६ मिनिटे, २०२१ मध्ये ८८ मिनिटे आणि २०२२ मध्ये ८३ मिनिटे भाषण केले.
२०१५ मध्ये नेहरुंच्या भाषणाचा रेकॉर्ड काढला मोडीत
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ मिनिटांचे भाषण करुन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडीत काढला. यापूर्वी १९४७ मध्ये नेहरुंनी लाल किल्ल्यावरून ७२ मिनिटांचे भाषण केले होते. विशेष बाब म्हणजे संसदेतही सर्वांत जास्त वेळ भाषणाचा रेकॉर्ड पंतप्रधान मोदी यांच्या नावे आहे.
लोकसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास २ तास १३ मिनिटे आणि ५३ मिनिटांचे सर्वात जास्त वेळ भाषण करत आत्तापर्यंतच्या भाषणाचे रेकॉर्ड मोडीत काढले.