भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यादिन आज देशभरात साजरा केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्यादिनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. आजच्या दिवशी लोक देशभक्तीमध्ये बुडून जातात. जो तो आपापल्या पद्धतीने आपलं देशावर असणारं प्रेम व्यक्त करत असतो. सध्या मध्य प्रदेशातील एका छोट्या दुकानदाराचा असाच एक देशभक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही सलाम कराल. हा व्हिडिओ डीएसपी संतोष पटेल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
मध्य प्रदेशचे डीएसपी संतोष पटेल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका वयस्कर व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. तिरंगा विकत घेतल्यावर ते चहा मोफत दिला जाईल, असं ते आजोबा सांगत आहेत. एवढेच नव्हे त्यांनी ती ऑफर एका कागदावर लिहिली असून तो कागद त्यांनी आपल्या दुकानात चिकटवली आहे. आजोबांनी सांगितले की, त्यांच्याकडे २० आणि ५० रुपयांचा एक तिरंगा आहे.
…म्हणून चहा मोफत –
डीएसपींनी विचारले की, तुम्ही मोफत चहा का देत आहात? यावर वृद्ध दुकानदार म्हणाला हा भारत मातेचा तिरंगा आहे, त्यामुळे चहा मोफत आहे. यानंतर आजोबांनी देशभक्तीपर गीतही गायले. दुकानातून तिरंगा विकत घेणाऱ्यांना त्यांनी मोफत चहा दिल्यांचही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीचे छावणीत रूपांतर झाले असून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG), नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि दिल्ली पोलिसांसह विविध सुरक्षा संस्थांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया –
आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांनी भारत माता की जय, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!, असं कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांनी बाबांच्या या अनोख्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आहे.