आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत स्वतंत्र होऊन तब्बल ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणजे सध्या देशभरात राबवण्यात येत असलेली ‘हरघर तिरंगा’ मोहीम. या मोहिमेअंतर्गत देशातील प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात येत आहे. याचसंबंधित एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत सर्व भारतीय आपल्या घरामध्ये राष्ट्रध्वज लावून आपली देशभक्ती दाखवत आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. मात्र, यादरम्यान एक वयस्कर महिला आणि तिचे पती यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे जोडपे आपल्या घराच्या छतावर एकमेकांच्या मदतीने झेंडा लावताना दिसत आहेत.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो पोस्ट आहे. ते नेहमीच काहीतरी वेगळी कामगिरी करणाऱ्या भारतीयांना प्रोत्साहन देताना आणि त्यांचे मनोबल वाढवताना दिसतात. सध्या त्यांनी शेअर केलेला या वयस्कर जोडप्याचा फोटो नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. आनंद महिंद्रा यांनी या फोटोच्या माध्यमातून अतिशय सुंदर संदेश दिला आहे. त्यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये म्हटलंय, “यावेळी स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दल या दोघांना विचारा. कोणत्याही प्रवचनापेक्षा हे दोघे तुम्हाला यामागील कारण जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. जय हिंद.”
या फोटोमध्ये एक वृद्ध जोडपे दिसत आहे. दोघे गच्चीवर उभे आहेत. वृद्ध महिला लोखंडी ड्रमवर चढून लोखंडी रॉडवर झेंडा लटकवताना दिसत आहे. खाली तिचा नवरा ड्रम धरून उभा आहे जेणेकरून तो आपल्या पत्नीला आधार देऊ शकेल. म्हातारे असूनही त्यांचे राष्ट्रध्वज आणि देशाबद्दलचे प्रेम पाहण्यासारखे आहे.
या फोटोत दिसणारे लोक त्या पिढीतील आहेत ज्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ आजच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्या लोकांनी देश स्वतंत्र होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता, त्यामुळे त्यांच्या भावना आपल्या सर्वांपेक्षा जास्त आहेत. या फोटोला एक लाख १७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत, तर १२ हजारपेक्षा जास्त वेळा हा फोटो रिट्वीट केला गेला आहे.