India Canada Dispute: प्रसिद्ध कंपनी boAt ने कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंगच्या आगामी इंडिया कॉन्सर्टसाठी दिलेले प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुभनीतने खलिस्थानला समर्थनार्थ पोष्ट केल्याने हा वाद पेटला आहे. boAt कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करत काहीही झालं तरी आधी आपण एक भारतीय कंपनी आहोत आणि भारताच्या विरुद्ध गोष्टींना समर्थन देणार नाही असे ट्वीट केले आहे. दुसरीकडे विराट कोहलीने सुद्धा या प्रकरणानंतर इंस्टाग्रामवरून शुभनीतला अनफॉलो केले आहे. नेमका हा वाद काय आणि त्याला कारण ठरलेली पोस्ट काय होती हे ही पाहूया..
२०२३ च्या सुरुवातीलाच शुभनीतने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जम्मू-काश्मीर आणि पंजाबशिवाय भारताचा नकाशा पोस्ट केला होता ज्यामुळे वाद सुरु झाला होता. पीटीआयच्या माहितीनुसार, Cordelia Cruise वर आयोजित Cruise Control 4.0 कार्यक्रमाचा एक भाग म्हणून २३ -२५ सप्टेंबर दरम्यान मुंबईत शुभनीत परफॉर्म करणार आहे त्यानंतर तो नवी दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्येही कॉन्सर्ट घेईल.
काही दिवसांपूर्वी, भाजपाची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM), भारतामध्ये ‘खलिस्तान’ समर्थकांना स्थान नाही, असे म्हणत शुभनीतच्या कॉन्सर्टचे पोस्टर्स काढून टाकले होते. BJYM चे अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले, की “भारताच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शत्रू असलेल्या खलिस्तानींना जागा नाही. आम्ही कॅनडाचा गायक शुभला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत, मुंबईमध्ये कार्यक्रम करू देणार नाही. योग्य कारवाई न केल्यास आयोजकांवर कारवाई केली जाईल”
हे ही वाचा<< ..म्हणून WHO च्या प्रमुखांनी कोविडची लस घेतली नाही? नेटकरी म्हणतात, हद्दच झाली! संपूर्ण प्रकरण वाचा
दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारत व कॅनडा यांच्यातील वाद समोर येत आहे. मागील वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने सोमवारी केला आणि ओटावा येथील नवी दिल्लीच्या गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी केली. राजनैतिक हालचालीमुळे दोन्ही देशांमधील संबंध, आधीच बिघडत असताना आता हा नवा वाद उफाळून आला आहे. दरम्यान, भारताने जस्टिन ट्रुडो यांचा आरोप फेटाळून लावला आहे.