मुंबईतील वानखडे स्टेडियमवर आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. तसेच भारत उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करीत भारताने ३५७ धावा केल्या आणि त्यानंतर विरुद्ध संघ श्रीलंकेचा ५५ धावांत त्यांचे सर्व गडी बाद करीत ३०२ धावांनी पराभव केला. मोहम्मद शमी या खेळाडूने या सामन्यात पाच विकेट्स घेऊन उत्तम कामगिरी बजावली. या सामन्यानंतर विविध माध्यमांतून व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत भारतीय संघातील खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे. यादरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने स्टेडियममध्ये उपस्थित एका चाहत्याला आपला बूट काढून दिला आहे .

व्हायरल झालेला हा व्हिडीओ वानखेडे स्टेडियमवरचा आहे. तेथे फॅन्सची एकच गर्दी दिसते आहे. भारत आणि श्रीलंकेचा सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये जात असतो. त्यादरम्यान काही फॅन्स रोहित शर्माला आवाज देत, तर काही जण आपल्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढताना दिसत आहेत. तेव्हा काही फॅन्सबरोबर रोहित शर्मा सेल्फी घेताना दिसतो आहे. तसेच व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, यादरम्यान रोहित शर्मा त्याच्या पायातील बूट काढून, एका चाहत्याच्या हातात देतो. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा… फुकट तिथे प्रकट! भजी खाण्यासाठी तुटून पडले लोक; उकळत्या तेलातून काढल्या भजी, VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

रोहित शर्माने चाहत्याला दिला आपला बूट :

तिकीट काढून स्टेडियममध्ये जाणारे चाहते त्याच्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. सामना बघण्याची त्यांना जेवढी उत्सुकता असते, तितकीच जास्त इच्छा त्यांना आवडत्या खेळाडूसोबत फोटो काढण्याची किंवा त्यांचा ऑटोग्राफ घेण्याची असते. आज या व्हायरल व्हिडीओत भारत संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी काढताना तर दिसलाच; पण त्याने आठवण म्हणून एका खास चाहत्याला आपला एक बूटसुद्धा काढून दिला. हे पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, चाहता त्या एका बुटाचे काय करणार? त्यावर व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने रिप्लाय दिला आहे की, रोहित शर्माने नंतर येऊन दुसरा बूटसुद्धा दिला.

स्टेडियममध्ये उपस्थित एक व्यक्ती हा व्हिडीओ शूट करीत असते. तसेच त्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Hitmancricket या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच “रोहित शर्माने सामन्यानंतर चाहत्यांसोबत सेल्फी घेतला आणि एमसीए स्टॅण्डमधील एका मुलाला त्याचे बूटही भेट दिले. हृदयस्पर्शी क्षण! #INDvSL”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून हा अगदीच हृदयस्पर्शी क्षण आहे, असे म्हणताना आणि विविध भावना व्यक्त करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.