भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणजे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईतच. त्याला पाहण्यासाठी किंवा त्याची एक छबी टीपण्यासाठी त्याच्या चाहत्यांची कायमच धावपळ चाललेली दिसते. असेच काहीसे चित्र नुकतेच पाहायला मिळाले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान कोहलीने आपल्या चाहत्यांना सही देऊन खुश केले आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसून आले आहे. बीसीसीआयने या घटनेचा व्हि़डियो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यामध्ये चाहत्यांच्या चेहऱ्यावरील भाव टीपले गेले आहेत.

ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या सामन्या दरम्यान भारतीय क्रिकेटप्रेमींचे विराटविषयी असणारे प्रेम दिसून आले. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याच ठरवले. भारतीय संघ जसा मैदानावर पोहोचला तसे चाहत्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यावेळी विराट कोहलीनेही आपल्या फॅन्सकडे पाहून हात हलवून त्यांना अभिवादन केले. मग तो आपल्या फॅन्सला भेटायलाही त्यांच्याजवळ गेला. तेव्हा त्याची सही घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली. यावेळी एक तरुणी तर त्याला पाहून अक्षरश: वेडी झाली होती. त्याला पाहून ती आनंदाने नाचत असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे १७ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. सलामीवीर शिखर धवनचे अर्धशतक (७६) आणि अनुभवी दिनेश कार्तिकच्या ३० धावांच्या खेळीनंतरही भारताने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.