भारत-पाक सामना म्हटलं की या महामुकाबलाचा एक एक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहणं याचा आनंद काही निराळाच…आज संध्याकाळी भारत विरूद्ध पाक असा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे…महामुकाबला दरम्यानचा ढोल-ताशांचा ताल, खेळांडूंनी मारलेल्या चौकार आणि षटकाराचा आवाज, क्रिकेट संघाचा ड्रेस घातलेल्या चाहत्यांपासून ते चीअरगर्लपर्यंतचा सर्व नजारा….तुम्हाला हे सारं काही वातावरण फक्त स्टेडियममध्येच अनुभवता येईल, असं नाही. एखाद्या स्टेडिअमप्रमाणेच भारत-पाकचा सामना पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये सर्वात मोठी एलईडी स्क्रीन बसवण्यात आलीय. त्यामुळे भारत-पाक महामुकाबलाचा थरार एखाद्या स्टेडिअमप्रमाणेच अनुभवा येणार आहे.
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. ज्या प्रेक्षकांना हा सामना थेट स्टेडिअममध्ये जाऊन पाहता येणार नाही अशा प्रेक्षकांसाठी हूबेहूब स्टेडिअमसारखा अनुभव घेता यावा यासाठी मध्य प्रदेशच्या चित्रपटगृह चालकाने एक अनोखी शक्कल लढवलीय. दुबईमध्ये न जाता तुम्हाला सर्वात मोठ्या एलईडी स्क्रीनवर भारत-पाकचा महामुकाबला पाहता येणार आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये असलेल्या ड्राइव्ह-इन सिनेमा परिसरात भारत-पाकिस्तान सामन्याचं थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी एलईडी स्क्रीन तब्बल २१०० फूट (७० x ३०) इतक्या आकारची असून भारत पाकचा सामना दुबईमध्ये न जाता हूबेहूब स्टेडिअमसारखाच माहौल आपल्याला अनुभवता येणार आहे.
पर्यटन विकास महामंडळाने संध्याकाळी ७ वाजल्यापासून ड्राईव्ह-इन सिनेमा येथे भारत विरुद्ध पाकिस्तान २०-२० हाय-व्होल्टेज क्रिकेट सामन्याचे (T20 विश्वचषक) थेट प्रक्षेपण आयोजित केलंय. पर्यटन विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ICC G20 विश्वचषक 2021 च्या दोन्ही देशांदरम्यान खेळल्या जाणार्या सामन्याचे प्रक्षेपण आणि प्रेक्षकांच्या सुविधा लक्षात घेऊन परिसरात सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
आता तुम्ही म्हणाल, भारत पाक सामना ज्या दिवशी असतो त्या दिवशी रस्त्यावर टीव्हीच्या दुकानाबाहेर जशी लोक रस्त्यावर उभं राहून हा सामना पाहत असतात, असंही इथेही आपल्याला उभं रहावं लागणार…पण जरा थोडं थांबा. कारण इथे राज्यातील सर्वात मोठ्या स्क्रीनवर हा सामना पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कारमध्ये बसून कोणाचा डिस्टर्बन्स न घेता हा तुम्हाला हवा तसा याचा आनंद लुटू शकता. त्यासाठी या परिसरात तुमच्या कार उभ्या करण्यासाठीची सोय करण्यात आलीय. सर्वात मोठ्या स्क्रीनसमोर रांगेत तुम्ही तुमच्या कार उभ्या करून हा सामना पाहू शकता.
ड्राइव्ह इन सिनेमाशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर सिनेमागृहात म्यूझिक सुद्धा वाजवलं जाणार आहे. सोबतच सिनेमागृहाच्या आवारात चालवल्या जाणाऱ्या फूड कोर्टमधून क्रिकेट प्रेमी त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ मागवू शकणार आहेत. हे पदार्थ त्यांना त्यांच्या कारमध्ये दिले जाणार आहेत.
सोशल मीडियावर सध्या या सर्वात मोठ्या एलईडी स्क्रीनचा चर्चा सुरूय. हूबेहूब स्टेडिअलसारखा माहौल देणाऱ्या या सर्वात मोठ्या एलईडी स्क्रीनवर भारत पाकचा सामना पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा मात्र रिकामा करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला २५० रुपये खर्च करावे लागतील.