ज्या ज्या वेळी क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकचा सामना होतो त्यावेळी केवळ खेळाडूंमध्येचही लढाई होत नाही तर दोन्ही देशातील नागरिक या सामन्यात प्रेक्षक रूपात उत्साहाने सहभागी होतात. भारत पाक सामना दरम्यान दोन्ही देशाच्या खेळाडूंमध्ये एकमेकांसोबत चांगले संबंध असले तरी जेव्हा ते आमने सामने येतात तेव्हा मैदानावर आणि सोबत मैदानाबाहेर सुद्धा एक वेगळंच वातावरण तयार होत असतं. मैदानापेक्षा जास्त मैदानाबाहेर जास्त तणाव दिसून येतो. टी २० विश्वचषकाच्या निमित्ताने आज भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. दोन्ही देशातील टीम एका मोठ्या गॅपनंतर आमने सामने येणार आहेत. त्यात महेंद्र सिंह धोनी सुद्धा भारतीय क्रिकेट टीमसोबत एका नव्या रूपात एन्ट्री करतोय. त्यामुळे या सामन्यासाठी फॅन्समध्ये देखील मोठी उत्सुकता दिसून येतेय. भारत पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्याला काही तास शिल्लक राहिले असतानाच धोनीचा पाकीस्तानी जबरा फॅन ‘चाचा शिकागो’ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. जबरा फॅन ‘चाचा शिकागो’ यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी एक खास संदेश दिलाय.

भारतीय खेळाडूंवर अत्यंत प्रेम करणाऱ्या काही पाकिस्तानी चाहत्यांमध्ये हा वृद्ध चाहता ज्यांना ‘चाचा शिकागो’ उर्फ ​​मोहम्मद बशीर म्हणून ओळखलं जातं. हे ‘चाचा शिकागो’ टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे खूप मोठे फॅन आहेत. आज होणाऱ्या टी 20 विश्वचषक 2021 निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याआधी ‘चाचा शिकागो’ यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधून त्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासाठी खास संदेश देखील दिलाय. भारतीय क्रिकेट टीमच्या फॅन्स ग्रुपच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेज ‘भारत आर्मी’ वर त्यांचा हा नवा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ‘चाचा शिकागो’ हे जर्सीमध्ये दिसून येत आहेत. अर्धा भाग भारत आणि अर्धा भाग पाकिस्तानच्या जर्सीला एकत्र करत त्यांनी परिधान केलेली ही स्पेशल जर्सी खूप काही सांगून जाते. दोन्ही देशांची जर्सी एकत्र करत त्यांनी परिधान केलेल्या या जर्सीच्या मधोमध ‘वेलकम बॅक धोनी’ असं इंग्रजीमध्ये लिहिलंय. या व्हिडीओमधून त्यांनी आपल्या पाकिस्तान टीमच्या विजयासाठी सुद्धा प्रार्थना केलीय. पण सोबतच त्यांनी या व्हिडीओमधून एमएस धोनीसाठी असलेलं प्रेम देखील व्यक्त केलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ‘चाचा शिकागो’ यांनी पाकिस्तानच्या विजयासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. या व्हिडीओच्या शेवटी ते म्हणतात, “अगदी मनापासून एमएस धोनीसाठी माझ्याकडून खूप सारं प्रेम… “. १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धोनी टीम इंडियामध्ये मार्गदर्शक म्हणून परतला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून T20 विश्वचषक जिंकला होता.

जून २०१९ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये एकदिवसीय विश्वचषक सामना खेळला गेला तेव्हा धोनीने शिकागोला तिकीट दिलं होतं. कराचीमध्ये जन्मलेले ‘चाचा शिकागो’ म्हणजेच बशीर हे पाकिस्तानी टीमचे फॅन आहेत, पण ते टीम इंडियाचे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीला उघड उघड सपोर्ट सुद्धा करतात.

भारत पाक सामन्याला काही तास शिल्लक राहिले असतानाच सोशल मीडियावर सध्या ‘चाचा शिकागो’ यांचा हा नवा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. एका दिवसात या व्हिडीओला आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४५९ युजर्सनी हा व्हिडीओ ट्विटरवर रिट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत ‘चाचा शिकागो’ ?

‘चाचा शिकागो’ यांचं नाव ​​मोहम्मद बशीर असून ते पाकिस्तानचे आहेत. शिकागोमध्ये ते एक रेस्टॉरंट चालवतात. धोनीने ज्यावेळी निवृत्ती घेतली त्यावेळी ते म्हणाले होते, ‘धोनी निवृत्त झाला आणि मीही. तो खेळत नसल्यामुळे, मला वाटत नाही की मी पुन्हा क्रिकेट पाहण्यासाठी प्रयत्न करेन. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि त्या बदल्यात त्याने मला परत प्रेमही दिले.”

टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होणारेय. दोन्ही संघांचा सुपर-12 गटातील हा पहिलाच सामना आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ५ सामने झाले असून टीम इंडियाने पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात काय होणार, याकडे साऱ्यांचेच डोळे लागले आहेत.

Story img Loader