Harnaaz Sandhu Miss Universe Viral Video : यंदाचा मिस युनिव्हर्सच्या सौंदर्यस्पर्धेत अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएलने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे. संपूर्ण जगभरातील कलाकारांची सौंदर्यस्पर्धेचा फिनाले इव्हेंट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल पहिली तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ दुसरी उपविजेता ठरली. त्यामुळे विजेतेपदाच्या मानाच्या मुकूटावर गॅब्रिएलचं नाव कोरलं गेलं. गतवर्षीची मिस युनिव्हर्स भारताची हरनाज संधू हिने आर बोनी गॅब्रिएलच्या डोक्यावर यंदाच्या मिस युनिव्हर्सचा मानाचा मुकूट घातला. गॅब्रिएलला मुकूट देऊन तिचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्प वॉक करणारी भारताची हरनाज संधू मंचावर येत असताना प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हरनाज संधूचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ मिस युनिव्हर्सच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
‘मिस युनिव्हर्स’ म्हणून शेवटचा रॅम्प वॉक करताना हरनाज संधू झाली भावूक, म्हणाली…
मिस युनिव्हर्स किताब पटकावण्यासाठी जगभरातून ८६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र आज १५ जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे संपन्न झालेल्या या मिस युनिव्हर्स स्पर्धेत आर बोनी गॅब्रिएलने मानाचा तुरा रोवला. मिस युनिव्हर्सच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जगभरातून गॅब्रिएलवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कर्नाटकच्या दिविता रायने केले. पण दिविताला या स्पर्धेत १६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, हरनाज संधूने या रंगतदार स्पर्धेच्या अंतिम क्षणी तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण हरनाजला इतक्या मोठ्या मंचावर येण्याचं पुन्हा एकदा भाग्य लाभलं.
हरनाज संधू राजकुमारीसारखीच स्टेजवर चालताना दिसत होती. रॅम्पवर चालत असताना ती खूप भावूक झाली होती. त्यामुळे चालत असताना तिचा थोडासा तोलंही गेल्याचं व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हरनाज संधू स्टेजवर ऐटीत चालत असताना बॅकग्राऊंडला व्हॉईस ओवर देत हरनाजवर स्तुतीसुमने उधळण्यात आली. “मी जेव्हा १७ वर्षांची होती, तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर मानाचा तुरा लोवला आणि त्यानंतर २२ वर्षांची असताना मिस युनिव्हर्सच्या किताबावर नाव कोरलं.” अशाप्रकारचा आवाज बॅकग्राऊंडला सुरु होता. त्यानंतर हरनाजने भाषणात तिचा प्रवास सांगितला आणि “नमस्ते युनिव्हर्स म्हणतं भाषणाची सांगता केली.