भरपूर पगार, सहा महिने सुट्ट्या व बिझनेस क्लास सुविधा, अशी नोकरी मिळाली तर? अशाच एका नोकरीची जाहिरात निघाली आहे; जी सर्वत्र चर्चेत आली आहे. त्यानुसार फक्त दोन मुलं सांभाळण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये पगार मिळणार आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी यांना त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी एक आया हवी आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एक आठवडा रोटेशननुसार काम करावे लागेल आणि एक आठवड्याची रजा असेल, असे या जाहिरातीत म्हटले आहे. मात्र, यावेळी त्यांनी जाहीर केलेली पगाराची रक्कम एकून तुम्हीही अवाक् व्हाल.
मुलं सांभाळण्यासाठी ८३ लाख पगार
या कामात जी कुणी व्यक्ती त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी येईल त्या व्यक्तीला ८३ लाखांचे पॅकेज दिले जाईल. त्यांनी जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, पूर्ण वर्षात त्यांना सहा महिने काम आणि सहा महिने रजा असणार आहे. याचाच अर्थ सहा महिन्यांचे ८३ लाख इतके पॅकेज दिले जाईल. पण, या कामासाठी इतके पैसे का बरं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊ या या प्रश्नाचं उत्तर…
भारतीय-अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी
खरं तर, आम्ही अमेरिकेतील रिपब्लिकन इलेक्टोरल पार्टीचे संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांच्याबद्दल बोलत आहोत. एस्टेटजॉब्स डॉट कॉम या अमेरिकन जॉब एजन्सीद्वारे त्यांनी आयासाठी जाहिरात दिली आहे. मुलांची काळजी घेण्यासाठी आयाची गरज असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. या नोकरीसाठी सुमारे ८३ लाख रुपये दिले जातील. भारतीय-अमेरिकन अब्जाधीशांनी आपल्या घरगुती कामातील कर्मचारी वाढवण्यासाठी ही जाहिरात दिली आहे; ज्यामध्ये आयाचं पद सध्या रिक्त आहे.
नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराला वयाची मर्यादा
नोकरीच्या जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला केवळ नोकरीच नाही, तर उच्च प्रोफाइल कुटुंबाशी कनेक्ट होण्याची आणि काम करण्याची संधी मिळणार आहे. दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी लाखोंचा पगार मिळणार आहे. त्याशिवाय कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी मिळेल. तसेच, नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवाराला या श्रीमंत कुटुंबासोबत राहण्याची आणि प्रवास करण्याची संधीही मिळेल. परंतु, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान २१ वर्षं असावं, अशी अट आहे.
हेही वाचा >> VIDEO: ‘जीतेंगे भाई जीतेंगे’ पाकिस्तानच्या गायकाचे वर्ल्ड कप साँग; ऐकाल तर हसून हसून लागेल पुरती वाट
खाजगी जेटचा आनंद
या नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला दर आठवड्याला कुटुंबासह खासगी जेटमधून प्रवास करण्याची संधीही मिळणार आहे. अशी संधी महिन्यातून अनेकदा मिळू शकते. कारण- रामास्वामी यांचे कुटुंबीय अनेकदा प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. त्यामुळे ही जाहिरात पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत; काहींनी तर अर्जही पाठवले आहेत. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. ही तर स्वप्नातली नोकरी, अशाच नोकरीच्या शोधात होतो, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करीत आहेत.