पवलोक या वेअरेबल डिव्हाइज कंपनीचा भारतीय-अमेरिकन वंशाचा संस्थापक असणाऱ्या मनीष सेठीने एका आगळ्यावेगळ्या कामासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केलीय. मनीषने फेसबुक वापरल्यास किंवा पाहिल्यास ही महिला त्याला कानाखाली लगावणार. अमेरिकेमधील क्लासिफाइड वेबसाईट्स क्राजीलिस्टवरुन त्याने या तरुणीची नियुक्ती केली आहे. या कामासाठी मनीष या महिलेला तासाचे ८ डॉलर्स म्हणजेच जवळजवळ ६०० रुपये देतो. तर या महिलेचं काम काय आहे असं प्रश्न पडला असेल तर मनीष जेव्हा कंप्युटरवर किंवा मोबाईलवर काम करत असेल तेव्हा त्याच्या बाजूला बसून तो फेसबुक पाहत नाहीय ना याची काळजी घेणं आणि तो तसं करताना दिसला तर त्याला कानाखाली मारणं हे या महिलेचं काम आहे. हे काम ती मनीषच्या ऑफिसमध्ये, घरी आणि कॅफेमध्येही करते.

“मी टाइमपास करत असेल तर तुम्हाला माझ्यावर ओरडावं लागेल, माझ्या कानाखाली मारावी लागेल,” असं त्याने २०१२ साली दिलेल्या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर त्याने कारा नावाच्या मुलीला ‘स्लॅपर’ म्हणजेच कानाखाली मारणारी या पदावर नियुक्त केलं. विशेष म्हणजे याचा त्याला सकारात्मक परिणाम दिसून आलाय. “साधारणपणे माझी सरासरी कार्यक्षमता ही ३५ ते ४० टक्के होती. आता कारा माझ्या बाजूला बसून माझ्यावर लक्ष ठेवते तेव्हा माझी कार्यक्षमता ९८ टक्क्यांपर्यंत असते,” असं मनीषने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

२०२१ मध्ये मनीषच्या या प्रयोगाबद्दल बरंच काही छापून आलेलं. मात्र आता ९ वर्षानंतर मनीषला एलॉन मस्ककडून या पोस्टवर एक कमेंटच्या स्वरुपात प्रतिसाद मिळालाय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारा एलॉन मस्क हा अशी व्यक्ती आहे जो त्याच्या एका ट्विटने क्रिप्टोकरन्सीला थेट सर्वोच्च स्तरावर नेऊ शकतो किंवा आपटू शकतो. एलॉन मस्कच्या प्रत्येक ट्विटची चर्चा होते. असं असताना त्याच्याकडून मिळालेला प्रतिसाद मनीषसाठी खासच आहे.

टेस्ला आणि स्पेस एक्सचा संस्थापक असणाऱ्या एलॉन मस्कने मनीषच्या प्रयोगासंदर्भातील बातमीवर दोन फायर इमोजी वापरुन प्रतिक्रिया दिलीय. म्हणजेच त्याला हा प्रयोग आवडला असून त्याबद्दल उत्सुकता असल्याचं त्याने अप्रत्यक्षपणे म्हटलंय.

या बातमीवर मनीषनेही रिप्लाय केलाय. “या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मी आहे. एलॉन मस्कने मला दिलेले दोन इमोजी ही माझी सर्वात मोठी कमाई आहे का?,” असं म्हणत मनीषने यावर रिप्लाय केलाय.

मनीषने आपण याच प्रयोगामधून पवलोकची स्थापना केल्याचं म्हटलं आहे. हे असे वेअरेबल डिव्हाइज आहेत जे वापरणाऱ्या व्यक्तीच्या चांगल्या सवयींसाठी त्यांना रिवॉर्ड देतात तर वाईट सवयींसाठी शिक्षा.

Story img Loader