सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. काही राज्यांमध्ये तापमान ४४ डिग्रीच्या पार जाऊन पोहोचले आहे; वाढत्या उष्णतेमुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे, तर घरातही उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत; तर दुसरीकडे राजस्थानच्या तळपत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही जवानांच्या देशसेवेला कडक सॅल्युट ठोकाल. कारण या व्हिडीओत एक जवान राजस्थानमधील तापलेल्या वाळूत पापड भाजून दाखवतोय, यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की, जवान कडक उन्हात किती खडतर स्थितीत सेवा बजावत असतील.
राजस्थानमध्ये जवानाने वाळूत पापड ठेवला, ज्यानंतर अवघ्या ७ मिनिटांत पापड ७० टक्के भाजून निघाला, यावरून तुम्ही बिकानेरमधील उन्हाची तीव्रता काय आहे याची कल्पना करू शकता. मात्र, इतक्या भीषण स्थितीतही जवान जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडत आहेत, यावरून अनेक नेटकऱ्यांनी जवानांच्या कार्याला सलाम केला आहे.
सध्या राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४७ सेल्सिअस इतके तापमान आहे. यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतेय की, बिकानेरमध्ये कर्तव्यावर असलेला एक बीएसएफ जवान उन्हाने कडक तापलेल्या वाळूवर पापड भाजत आहे.
उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून लोक एसी आणि कुलरचा वापर करताना दिसतायत, पण दुसरीकडे देशाच्या सीमेवर तैनात जवान कडाक्याच्या उन्हात रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशवासीयांचे रक्षण करत आहेत.
हा व्हिडीओ @Ayesha86627087 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर एका युजरने म्हटले आहे की, भारतीय जवानांचे कौतुक करावे तितके कमी आहे, जवान खूप कठीण आणि संघर्षमय परिस्थितीत कर्तव्य बजावत आहेत. अनेकांनी त्यांच्या या देशसेवेसाठी कडक सॅल्युट ठोकले आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाकिस्तानच्या सीमेजवळील बिकानेरच्या खादुवालामधील असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानातील बिकानेर हे शहर सर्वात उष्ण शहर म्हणून ओखळले जाते. पण, कडक उन्हातही आपले जवान देशाच्या रक्षणासाठी तत्परतेने कार्य करत आहेत.