Wildlife Photographer of the Year ‘वाईल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ दी इअर’ हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार १० वर्षांच्या अर्शदीप सिंगनं पटकावला आहे. लहानग्या अर्शदिपनं टिपलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘ब्रिटन नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअम’तर्फे दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते. होतकरू छायाचित्रकारांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. तीन वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. १० वर्षे आणि त्याखालील मुलं, ११ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा होती.
जगभरातील छोटे छायाचित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले होते. पण या स्पर्धेत अर्शदीपनं बाजी मारली आहे. अर्शदीप ६ वर्षांचा असल्यापासून छायाचित्रं टिपत आहे. अर्शदीपचे वडील हेदेखील छायाचित्रकार आहेत. त्यानं टिपलेल्या ‘पाईप आउल्स’ छायाचित्राला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. पाईपच्या एका तुकड्यामध्ये घुबडाची पिल्लं राहत होती. विशेष म्हणजे सकाळच्यावेळीदेखील ही पिल्लं पाईपच्या तुकड्यातून तोंड बाहेर काढून बाहेरची हालचाल कुतूहलानं पाहत होती. अर्शदीपला हे दृश्य फारचं मजेशीर वाटलं त्यामुळे त्यांनं वेळ न दवडता आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपलं आहे. खरं तर घुबड निशाचर त्यामुळे सकाळच्या वेळी ते क्वचितच नजरेस पडतात म्हणूनच हा फोटो सर्वात वेगळा ठरला आहे.