विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्याचं स्वप्न पॅट कमिन्सच्या संघानं धुळीस मिळवलं. त्यानंतर भारतीय संघातील अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनुभवाबाबत, आपल्या भावनांबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण कर्णधार रोहित शर्मा मात्र काहीसा अज्ञातवासात गेल्याचं जाणवू लागलं होतं. मात्र, अंतिम सामन्यानंतर जवळपास आठवड्याभरानंतर रोहित शर्मानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघातले इतर खेळाडू सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कर्णधार रोहित शर्मानं मात्र यासंदर्भात कोणतीही पोस्ट शेअर केलेली नव्हती. किंबहुना रोहितनं सोशल मीडियावरून जवळपास ब्रेकच घेतल्याचं दिसत होतं. मात्र, रविवारी रोहित शर्मानं एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जॉन्स या एक्सवरील (ट्विटर) खात्यावरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत वर रोहित शर्माचं नावही दिसत असून ते त्याचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट असल्याचं स्पष्ट होत आहे.

काय आहे फोटोमध्ये?

रोहित शर्मानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीसाठी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन व्यक्ती फुलांनी डवरलेल्या झाडांच्या मधून जाणाऱ्या एका रस्त्यावरून चालत असल्याचं दिसत आहे. या दोन व्यक्ती म्हणजे स्वत: रोहित शर्मा व त्याची पत्नी रितिका सजदेह असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास दीड महिना चाललेल्या विश्वचषकाच्या प्रदीर्घ वेळापत्रकानंतर रोहित शर्मानं काही काळ आपल्या कुटुंबासमवेत घालवण्याचा निर्णय घेतला. त्याचसाठी त्यानं सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेतही न खेळण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा पराभवामुळे प्रचंड निराश झाल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर रोहित शर्माची ही इन्स्टाग्राम स्टोरी चाहत्यांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

अंतिम सामन्यानंतर काय म्हणाला होता रोहित?

रोहित शर्मानं अंतिम सामन्यातील पराभवामागे फलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याचं कारण दिलं होतं. “सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आज आम्ही विजयासाठी आवश्यक तेवढा चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे”, असं रोहित म्हणाला. “खरंतर आणखी २०-३० धावा झाल्या असत्या, तर कदाचित आम्हाला आणखी मदत झाली असती. जेव्हा विराट कोहली आणि के. एल. राहुल खेळत होते, तेव्हा आम्ही २७०-२८० धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. पण सातत्याने आमचे गडी बाद होत गेले”, असंही रोहितनं नमूद केलं होतं.

Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

पराभवानंतर रोहित शर्मा भावुक

दरम्यान, अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा भावुक झाल्याचं दिसून आलं. मैदानात सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला हस्तांदोलन केल्यानंतर रोहित शर्मा वेगानं ड्रेसिंग रूमच्या दिशेनं निघून गेला. यावेळी मैदानाबाहेर जाताना रोहित शर्माच्या डोळ्यांत अश्रू आल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian captain rohit sharma instagram story after world cup final loss pmw