गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर
झाला आहे, अनेक तर्क वितर्क आणि भाकीते खोटी ठरवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘व्हाईट हाऊस’मधील मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच होणार ! याची औपचारिक घोषणा जानेवारीत केली जाईल. ट्रम्प यांच्या विजय पक्का होताच अमेरिकेतल्या ट्रम्प समर्थकांनी विजयाचा एकच जल्लोष केला. या निवडणुका जरी दूर तिथे अमेरिकत लढल्या जात असल्या तरी भारतात देखील या निवडणुकांचे रंग पाहायला मिळाले आहे. डोनाल्ड यांना खास भारतीय पद्धतीने शुभेच्छा देणारे मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

‘बघताय काय रागानं… इलेक्शन मारलीय वाघानं !’ ‘नाद करायचा नाही..’ असे खास मराठी शुभेच्छा डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्या जात आहेत. तर  नागपूरमध्ये केंद्रीय विकास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ट्रम्प यांचा विजय साजरा केला. ट्रम्प यांना शुभेच्छा देणारे पोस्टर हातात घेऊन या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गरजात ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. तर हिंदु सेनेने देखील ट्रम्प यांचा विजय साजरा केला आहे. ट्रम्प यांना भारतीयांकडून मोठा पाठिंबा मिळत होता. काही दिवसांपूर्वी एका भाषणात ट्रम्प यांनी भारत आणि भारतीय संस्कृतीचे खूपच कौतुक केले होते. इतकेच नाही तर भारतीयांना खूश करण्यासाठी एक दोन वाक्ये देखील हिंदीत त्यांनी म्हटली होती. त्याची छोटी व्हिडिओ क्लिपही इंटरनेटरवर व्हायरल झाली होती. ट्रम्प यांचे भारत प्रेम पाहता अनेक भारतीयांचा त्यांना पांठिबा मिळत होता. ट्रम्प यांच्या विजयासाठी मुंबईत एका ट्रस्टने होमहवन देखील केले होते.