तुमच्यापैकी अनेक जण महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जात असतील. अनेकदा अशा हॉटेल्समधील मेन्यू पाहूनच गोंधळायला होते. कारण- यात अशा काही अनोख्या विचित्र डिश असतात; ज्या आपण पहिल्यांदाच पाहत असतो. काही वेळा तो पदार्थ खाणे तर दूरच; पण त्याचे नावही नीट घेता येत नाही. काही पदार्थांची किंमतच इतकी असते की, ते पाहून थक्क व्हायला होते. त्यात एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे पदार्थ खाऊन झाल्यानंतर प्रश्न पडतो की, या हॉटेलवाल्याने इतके पैसे नेमके कशासाठी घेतले. दरम्यान, एका शेफने एक व्हिडीओ शेअर करीत महागड्या हॉटेलमध्ये तुमची महागडी डिश कशी तयार केली जाते ते दाखवले आहे.
भाजलेल्या गाजरापासून बनवलेली डिश
व्हिडीओमध्ये शेफ १५ रुपयांच्या गाजरापासून १५०० रुपयांची डिश कशी बनवली जाते ते सांगत आहे. सर्वप्रथम तो गाजर भाजतो आणि त्यावर काही मसाले टाकतो. त्यात त्याने मसाल्यांसोबत भाजलेले हरभरेही टाकले आहेत. हे सर्व केल्यानंतर तो एक सफेद प्लेट उचलतो आणि त्यावर एक प्रकारची पेस्ट लावतो. त्यानंतर तो भाजलेले गाजर पेस्टवर ठेवतो आणि नंतर कोथिंबीर व इतर गोष्टी टाकतो. शेवटी तो १५०० रुपयांच्या डिशला फायनल टचअप देतो.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेफ अभिलाष (chefabhilash) नावाच्या युजरने शेअर केला आहे; ज्यात त्याने महागड्या हॉटेल्समध्ये लोकांना कसे लुटले जाते ते सांगितले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले- हॉटेलमालकाला हिंदी येत नाही. त्यामुळे तुमची नोकरी अजूनही वाचली आहे. तर दुसर्या एकाने लिहिले, भाऊ, तू व्हिडीओ बनवून आणि आम्ही तो पाहून त्या पदार्थांचे पैसे कमी होणार नाहीत. अशा प्रकारे युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.