Indian Currency : प्राचीन वस्तूंना इतिहासात नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे. या वस्तू केवळ कलाकृती म्हणूनच नाही, तर त्यांच्याकडे मौल्यवान संग्रहणीय वस्तू म्हणूनही पाहिले जाते. जुनी चित्रे, दागिने, दुर्मीळ नाणी किंवा ऐतिहासिक कागदपत्रे असोत; अशा वस्तूंतून आपल्याला भूतकाळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. कालांतराने या संग्रहित वस्तूंचे मूल्य वाढते. त्यापैकी जुन्या चलनी नोटा आणि नाणी सध्या संग्रहणीय वस्तू ठरल्या आहेत. अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याचा छंद असतो. ते हा छंद जपताना दुर्मीळ नोटा खरेदी करण्यासाठी प्रसंगी मोठी किंमतही मोजण्यास तयार असतात. त्यामुळे जर तुमच्याकडेही जुन्या नाणी आणि नोटा असतील, तर त्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.
विशेषत: जुन्या काळातील १ रुपयाच्या नोटेला विशेष मागणी आहे. ही १ रुपयाची नोट जास्त किमतीत विकली जाण्याचे कारण म्हणजे या नोटांची छपाई सुमारे २९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. त्यामुळे या नोटा दुर्मीळ झाल्या; पण, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात २०१५ मध्ये या नोटांची छपाई पुन्हा सुरू करण्यात आली. असे असले तरीही स्वातंत्र्यापूर्वी जारी केलेल्या काही नोटा चढ्या किमतीत खरेदी केल्या जातात. चलन संग्राहकांमध्ये या नोटांना विशेष मागणी आहे. कारण- त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील नोटा असल्याने त्या अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान मानल्या जातात.
आज काही जुनी नाणी, नोटा संग्राहक या दुर्मीळ आणि ऐतिहासिक नोटांसाठी लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. तुम्ही ही नोट कॉइन बाजार, क्विकर किंवा ईबे यांसारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता; याच साइट्सवर दुर्मीळ १ आणि २ रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. ऑनलाइन लिलावात जुन्या १ रुपयाच्या एका नोटेमागे तुम्हाला सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण- प्रश्न असा उपस्थित होतो की, जुन्या नोटेसाठी इतके पैसे देण्यास कोण आणि का तयार होईल?
प्रत्येक जुन्या नोटेची किंमत लाखो रुपये नसते; परंतु ब्रिटिशकालीन भारतातील किंवा भारतीय स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळातील काही दुर्मीळ नोटा खूप मौल्यवान मानल्या जातात. कारण- त्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे दर्शवतात. या चलनी नोटांच्या किमती वाढण्यमागील एक प्रमुख कारण म्हणजे नोटेची दुर्मीळता. याचा अर्थ असा की, अशा काही मोजक्याच नोटा चलनात राहिल्याने आता संग्राहकांमध्ये त्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढतेय. त्याशिवाय त्या काळी छपाई करताना झालेल्या चुका, चुकीचा मजकूर छापणे किंवा वेगळे अनुक्रमांक यांसारख्या काही विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे काही नोटा आणखी खास ठरतात.
कोणत्या नोटा अत्यंत मौल्यवान आहेत?
१ रुपयाच्या या जुन्या नोटांना महत्त्व असण्याचे कारण म्हणजे त्या ब्रिटिश काळातील चलनी नोटा आहेत आणि त्यावर तत्कालीन गव्हर्नर जे. डब्ल्यू यांची स्वाक्षरी आहे. १९३५ मध्ये ब्रिटिशांनी जारी केलेली ही नोट सुमारे ९० वर्षांपूर्वीची जुनी आहे. अत्यंत दुर्मीळ आणि तितकेच ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे लिलावात या प्रत्येक नोटेला ७ लाख रुपयांपर्यंतचे मूल्य मिळू शकते.