Selena Gomez Jai Shree Ram Video: प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचा मोठा चाहतावर्ग नेहमीच या कलाकार मंडळींच्या भेटीसाठी निरनिराळे प्रयत्न करत असतो. काही चाहते अशा कलाकारांना भेटल्यानंतर वेगवेगळ्या मागण्या करत असतात. कुणाला सही हवी असते, कुणाला सेल्फी तर कुणाला आवडत्या कलाकाराशी दोन शब्द बोलण्याची इच्छा असते. पण हॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री व पॉप आयकॉन ३२ वर्षीय सेलेना गोमेझ एका चाहत्याच्या एका विनंतीमुळे काहीशी बुचकळ्यात पडली. पण वेळीच प्रसंगावधान दाखवत सेलेना गोमेझनं ती विनंती टाळली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सेलेना गोमेझचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम, एक्स या सोशल मिडिया साईट्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे किंवा कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नसली, तरी व्हिडीओमधील संवाद मात्र स्पष्टपणे ऐकू येत आहेत. या व्हिडीओमधील व्यक्ती सेलेना गोमेझला ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगत आहे.
…आणि सेलेना गोमेझनं काढता पाय घेतला!
व्हिडिओमध्ये एक भारतीय चाहता सेलेना गोमेझला भेटल्यानंतर त्यानं अभिनेत्रीसोबत सेल्फी व्हिडीओ काढला. या व्हिडीओमध्ये भारतीय चाहत्यानं सेलेना गोमेझला ‘जय श्रीराम’ म्हणायची विनंती केली. ‘ही भारतातली सर्वोत्तम घोषणा आहे’, असंही हा चाहता सेलेना गोमेझला म्हणत असल्याचं दिसत आहे. चाहत्याच्या विनंतीवर सेलेना काही क्षण बुचकळ्यात पडली. विनंती समजली नसावी किंवा समजून त्यावर काय करावं हे समजलं नसावं अशी काहीशी सेलेना गोमेझची अवस्था झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शेवटी सेलेनानं त्या चाहत्याला फक्त ‘थँक यू हनी’ म्हणत व्हिडीओमधून काढता पाय घेतला!
सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
दरम्यान, हा व्हिडीओ गेल्या वर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्याचा असल्याचा अंदाज काही नेटिझन्सनं लावला आहे. मात्र, त्याचवेळी सेलेना गोमेझला असंबद्ध विनंती केल्यावरून त्या चाहत्याला काही नेटिझन्सनं लक्ष्य केलं आहे. ‘सेलेना गोमेझला असा प्रश्न विचारायची काय गरज होती? ती भारतीय नाही. तिला या घोषणेसंदर्भात काही माहितीही नसेल’, असा आक्षेप एक्स युजर्सनं नोंदवला आहे. काहींनी ही विचित्र विनंती टाळण्यात सेलेनानं दाखवलेल्या युक्तिचं कौतुक केलं आहे.
३२ वर्षीय सेलेना गोमेझ ही हॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी महिला ठरली आहे. सेलेना गोमेझ अमेरिकेतली सर्वात तरुण बिलिअनेअर महिलाही आहे.