Indian Driver In Dubai win Rs 33 Crore: दुबईमध्ये काम करणाऱ्या एका भारतीयाचं नशीब रातोरात पालटलं आहे. मुळाचा हैदराबादचा असलेल्या अजय ओगुला या तरुणाला इजी ६ ग्रँड प्राइज अमिरीत ड्रॉची लॉटरी लागली आहे. या लॉटरीच्या बक्षीसाची रक्कम ही १५ मिलियन द्राम्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ३३ कोटी रुपये इतकी आहे.
अजय हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानाशी संबंधित सेवा देतो. मागील दहा वर्षांपासून अजय या ठिकाणी चालक म्हणून काम करत आहे. विशेष म्हणजे या लॉटरीच्या पहिल्या पर्वामध्येच अजयने ही लॉटरी जिंकली आहे. ३१ वर्षीय अजयने आपल्या बॉसबरोबर अशाच निवांत वेळात गप्पा मारताना लॉटरीमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या निर्णयामुळे आपलं आयुष्य बदलल्याचं अजय सांगतो. “तू पैसे इथे तिथे पैसे वाया घालवतो तर ते पैसे तू अशा एखाद्या संधीसाठी का वापरत नाहीस?” असं माझा बॉस मला नेहमी विचारायचा.
बॉसकडून सातत्याने होणाऱ्या विचारणेमुळे अजयने अमिरित ड्रॉ मोबाईल अॅप्लिकेशन डाउनलोड केलं. त्यानंतर त्यावरुन अजयने दोन तिकीटं विकत घेतली. तो पहिल्यांदाच अमिरित ड्रॉ इजी सिक्समध्ये सहभागी झाला होता.
लॉटरीचा निकाल लागल्यानंतर ईमेलवर अजयला याबद्दलची माहिती देण्यात आली तेव्हा ईमेलचा सब्जेक्ट वाचून आपल्याला छोटी-मोठी रक्कम मिळाली असेल असं त्याला वाटलं. “मी ती रक्कम पाहून स्तब्ध झालो. माझ्याकडे बोलायला काही शब्दच नव्हते,” असं अजयने ‘द नॅशनल’शी बोलताना सांगितलं. “हे खरं आहे का असा मला प्रश्न पडला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मला फोन आला तेव्हा माझ्याबरोबर काय घडलं याची कल्पना आली. मला धक्का बसला होता. मी फार नर्व्हस होतो. १५ मिलियन द्राम्स… काय करणार मी एवढ्या पैशांचं?” असा प्रश्न तो मुलाखतकारालाच विचारत होता.
नक्की वाचा >> ३१ लाखांची भेट आणि ती ही पराभूत उमेदवाराला! सरपंचपदाची निवडणूक हरलेल्याचा गावकऱ्यांकडून विशेष सत्कार, कारण…
अजय आता या पैशांचा वापर करुन सर्व कुटुंबियांना दुबईला फिरायला बोलणार असल्याचं सांगतो. तो त्याच्या मूळगावी घर बांधणार होता. त्याचबरोबर त्याला बांधकाम व्यवसायामध्ये उतरायचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी हे पैसे उपयोगाचे ठरतील असं वाटतंय. या शिवाय या पैशांमधून गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा आपला मानस असल्याचं अजय सांगतो.