अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी 90th Scripps National Spelling Bee स्पर्धेत भारतीय वंशाची मुलगी अनया विनय हिने बाजी मारली आहे. अनया फक्त १२ वर्षांची आहे. या स्पर्धेत अनयाला भारतीय वंशाचा स्पर्धक रोहन राजीव याची तीव्र स्पर्धा होती. तेव्हा दोन्ही भारतीय वंशाच्या मुलांमधला अटतटीचा सामना हा पाहण्यासारखाच होता. पण ‘marocain’ या शब्दाचं स्पेलिंग अचूक सांगून तिने या स्पर्धेत बाजी मारली. रोहन आणि अनया या दोघांमध्ये २० फेऱ्यांत ही स्पर्धा पार पडली. अनयाने तिला विचारण्यात आलेल्या स्पेलिंगपैकी ३५ शब्दांची स्पेलिंग अचूक सांगत प्रतिष्ठित अशा स्पेलिंग बी स्पर्धेचा किताब पटकावला.
‘hypapante’, ‘cheiropompholyx’,’ potichimanie’, ‘tchefuncte’, ‘brabançon’ आणि ‘rastacouère’ अशा कठीण शब्दांचे स्पेलिंग तिला विचारण्यात आले होते. ही स्पर्धा जिंकण माझं स्वप्न होतं. आज ते स्वप्न प्रत्यक्षात आलंय अशी प्रतिक्रिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिने ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिली. २०१३ नंतर पहिल्यांदाच एकाच स्पर्धकाने ही स्पर्धा जिंकली असेल. याआधीही या स्पर्धेमधलं बक्षीस विभागून देण्यात आलं होतं. आतापर्यंतचा इतिहास पाहता ही स्पर्धा भारतीय वंशाची मुलंच जिंकत आली आहेत. वन्या शिवशंकर (वय १३) व गोकुळ व्यंकटाचलम या दोन भारतीय वंशाच्या मुलांनी २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.