Indian ‘Super Mom’ : आई आपल्या मुलांवर सर्वांत जास्त प्रेम करते. ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मुलं मोठी झाली तरी आईची माया आणि काळजी करण्याचं तिचं काळीज काही आटत नाही. त्यामुळे मुलांच्या कर्तबगारीत आईचा वाटा मोलाचा असतो. आईचं हे मोठंपण अधोरेखित करणारी एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक भारतीय वंशाची आई आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी दररोज घर ते ऑफिस गाठण्यासाठी चक्क विमान प्रवास करतेय. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल; पण रोज घर आणि ऑफिस यातील संतुलन साधण्यासाठी ती रोज पहाटे ४ वाजता उठून सर्व तयारी करते.
मलेशियातील या भारतीय वंशाच्या आईला आता लोक सुपर ट्रॅव्हलर म्हणून ओळखत आहेत. एक आई म्हणून ती घर आणि ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने संतुलन साधतेय हे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. ती आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला जाण्यासाठी चक्क विमान प्रवास करते. त्यासाठी ती पहाटे ४ वाजता उठते, तयार होते आणि सर्व आवरून कामावर निघते.
राहेल कौर, असे या आईचे नाव आहे, जी एअर एशियाच्या फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर आहे. रिपोर्टनुसार, कौरची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती सांगतेय की, ती कामावर जाण्यासाठी मलेशिया ते सिंगापूर, असा विमान प्रवास करते. यावेळी काम आणि कुटुंब यात संतुलन कसे राखतेस, या प्रश्नावर ती उत्तर देते की, हे मला सोईचे आणि स्वस्त वाटते. त्याशिवाय मला घरी आपल्या मुलांबरोबर वेळ घालवता येतो.
“मुलांबरोबर वेळ घालवता येतो हे माझ्यासाठी दिलासादायक”
राहेल कौर पुढे सांगते की, मला दोन मुलं आहेत आणि दोघंही मोठे झाले आहेत. माझी मोठी मुलगी १२ वर्षांची आहे आणि धाकटी ११ वर्षांची आहे. मुलं मोठी होत आहेत; पण आई म्हणून मलाही वाटतं की, मी त्यांच्या आसपास असायला हवं. मला दररोज घरी जाऊन रात्री त्यांना पाहता येते. त्यांच्याबरोबर वेळ घालवता येतो हे माझ्यासाठी दिलासादायक आहे.
कौर सांगतात की, यापूर्वी त्यांनी क्वालालंपूरमधील तिच्या ऑफिसजवळ एक घर घेतले होते. पण, ते खूप महाग होते. या काळात ती आठवड्यातून फक्त एकदाच घरी जाऊ शकली. अशा परिस्थितीत मी माझ्या मुलांना फार क्वचितच भेटू शकत होते. म्हणून मी रोज विमान पकडून ऑफिसला जायचं ठरवलं.
क्वालालंपूरमध्ये घर भाड्यानं घेण्यासाठी तिला दरमहा RM१,४०० ते RM१,५०० (२४,५०० – २६,२५० रुपये) खर्च येतो. पण आता, तिच्या एअर एशिया स्टाफ डिस्काउंटचा वापर करून, ती प्रत्येक फ्लाइटसाठी RM५० खर्च करते – एकूण RM१,१०० (१९,२५० रुपये). तिचा जेवणाचा खर्च RM६०० (१०,५०० रुपये)वरून RM३०० (५,२५० रुपये)पर्यंत कमी झाला आहे, ज्यामुळे तिची एकूण RM७०० (१२,२५० रुपये) बचत झाली आहे.
व्हायरल व्हिडीओत राहेल कौर सांगतेय की, दररोज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी ती पहाटे ४ वाजता उठते. त्यासाठी पेनांग ते सेपांगला जाणारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांची फ्लाइट ती पकडते. ही फ्लाइट पकडण्यासाठी ती घरातून ५ वाजता एअरपोर्टवर पोहोचण्यास निघते. हा विमान प्रवास साधारणपणे ३० ते ४० मिनिटांचा आहे, ज्यात ती सुमारे ४०० किमी अंतर पार करुन सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ऑफिसला पोहोचते. ती संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत पेनांगला घरी परतते. दिवसभर काम करून ती रात्री ८ वाजेपर्यंत घरी परतते. आठवड्याचे ५ दिवस तिचे असे रुटीन असते. यात तिची दगदग तर फार होते; पण यातून मुलांना वेळ देता येतो याचाही तिला आनंद होतो.