शुक्रवारी वर्ल्डकप स्पर्धेत झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला पराभूत करत आपल्या खात्यात दोन गुणांची कमाई केली. मात्र, या सामन्यातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील चर्चेवरून नेटिझन्समध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओतील भारतीय पोलील अधिकाऱ्याने केलेल्या कृत्यावर काही नेटिझन्स टीका करत आहेत तर काहीजण भारतातील इतर चाहत्यांचा पाकिस्तानी चाहत्यांना कशा प्रकारे पाठिंबा आहे ते सांगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या सामन्यासाठी मोठ्या संख्येनं पाकिस्तानी चाहतेही स्टेडियममध्ये उपस्थित होते. यावेळी सुरक्षाव्यवस्थेशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याला हटकलं. हा तरुण सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत होता. मात्र, ड्युटीवर असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला ‘तुम्ही जिंदाबाद म्हणू शकत नाही’, असं सांगत हटकलं. यावर तो तरुण पोलिसाशी वाद घालू लागला.

सध्या या घटनेचा ४५ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी जर्सी घातलेल्या या तरुणानं वारंवार पोलिसाला विचारणा केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. “जर भारत माता की जय च्या घोषणा दिल्या जाऊ शकतात, तर मग पाकिस्तान जिंदाबाद का म्हणू शकत नाही. पाकिस्तानचा संघ खेळतोय, मी एक पाकिस्तानी आहे, मग पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?” असा सवाल हा तरुण त्या पोलिसाला विचारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय! ॲडम झाम्पाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव…

तरुणानं व्हिडीओ काढताच पोलिसाचा काढता पाय…

दरम्यान, आपला आक्षेप नेमका का आहे? हे पोलीस सांगत नसल्यामुळे अखेर तरुणानं खिशातून मोबाईल काढला आणि त्यानं सांगितलं की मी तुमचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो, तुम्ही व्हिडीओवर मला सांगा की मी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणू शकत नाही. यावर पोलीस अधिकाऱ्यानं तिथून काढता पाय घेतला व त्याच्याबरोबरच्या दुसऱ्या अधिकाऱ्यानं संबंधित तरुणाची समजूत काढली.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकारावर काही नेटिझन्सनं तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाकिस्तानच्या टीमला प्रोत्साहन देण्यापासून चाहत्यांना रोखलं जाणं चुकीचं असल्याचं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी संबंधित पोलीस अधिकारी संपूर्ण देशाचं किंवा भारतीयांचं प्रतिनिधित्व करत नाही, देशभरात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना भारतीय चाहत्यांकडून सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक दिली जात आहे, अशी बाजू काही नेटिझन्स मांडत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian police stops fan chanting pakistan zindabad in bengaluru pmw