Ticket Cancellation Charges: भारतीय रेल्वेने दररोज सुमारे ३ कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था मानली जाते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक बदल झाले आहेत. रेल्वेच्या अनेक सेवा- सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. पण एवढे सगळे करुनही रेल्वेचे काही नियम गेल्या अनेक वर्षांपासून तसेच होते. ज्यात बदल करणे फार आवश्यक होते. यातील एक नियम म्हणजे तिकीट रद्द करण्याच्या शुल्काबाबतचा नियम. यातून रेल्वेने बऱ्यापैकी कमाई केली मात्र प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. पण भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याबाबतच्या निमयांमध्ये बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे समजून घेऊ…
आता वेटिंग आणि आरएसी (RAC) तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे वेगळे शुल्क आकारणार नाही. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, जर एखाद्या प्रवाशाचे कोणतेही तिकीट वेटिंग किंवा आरएसीमध्ये असेल तर त्याच्याकडून सेवा शुल्क म्हणून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत.
कोणत्या क्लाससाठी किती पैसे घेतले जाणार?
भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता फक्त ६० रुपये कापले जातील. ज्यामध्ये स्लीपरसाठी १२० रुपये, थर्ड एसी तिकीट रद्द करण्यासाठी १८० रुपये, सेकंड एसी तिकीट रद्द करण्यासाठी २०० रुपये आणि फर्स्ट एसी तिकीट रद्द करण्यासाठी २४० रुपये कापले जातील.
यापूर्वी, रेल्वे सेवा शुल्क आणि वेटिंग आणि आरएसी तिकिटांवर किंवा इतर तिकीट रद्द करण्यावर सुविधा शुल्काच्या रूपात मोठी रक्कम वसूल केली जात होती. पण यामुळे प्रवाशांचे नुकसान होत होते. मात्र आता रेल्वेकडून शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट रद्द करताना तुमच्याकडून नियमांच्या बाहेर जाऊन कोणतेही अतिरिक्त पैसे मागितले जाणार नाहीत.
निर्णय का घेतला गेला?
झारखंडमधील गिरिडीह येथील सुनील कुमार खंडेलवाल, जे सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते आहेत, यांनी आरटीआय दाखल करून तिकीट रद्द करण्याच्या शुल्काबाबत तक्रार केली होती. यात त्यांनी रेल्वे केवळ तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून कोट्यवधी रुपये कमवत असून त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे अशी तक्रार केली होती. १९० रुपये किमतीचे तिकीट बुक केले जे वेटिंग लिस्टमध्ये होते परंतु ते रद्द केल्यानंतर केवळ ९५ रुपये परतावा म्हणून परत देण्यात आले, अशाप्रकारे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून भारतीय रेल्वे मोठी रक्कम जमा करत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. पण रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.