IRCTC Traveling in Train on RAC Ticket : तुम्ही कधी ना कधी भारतीय रेल्वेने प्रवास केला असेलच. त्यामुळे स्वाभाविकत: तुम्ही RAC (Reservation Against Cancelation)बद्दल ऐकले असेलच. एखाद्या ट्रेनमध्ये जेव्हा कन्फर्म बर्थ उपलब्ध नसतो तेव्हा लोक वेटिंग लिस्टमधून तिकीट काढतात. कन्फर्म तिकीट नाही; पण तिकीट निदान ‘आरएसी’ तरी आहे ना, असा विचार करून हे तिकीट काढले जाते. त्यामुळे तुम्हाला ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार मिळतो; पण ट्रेनमध्ये सीट किंवा बर्थ रिकामी असेल, तर एकाच बर्थवर दोन प्रवाशांना ‘मॅनेज’ करून बसावे लागते. अशा वेळी सीटसाठी सहप्रवाशाबरोबर वाद होतात. पाय पसरवण्यापासून ते बेड रोल किट (चादर, ब्लँकेट, उशी, टॉवेल) शेअरिंग अशा अनेक कारणांमुळे वादाला सुरुवात होते. पण, आता रेल्वेमध्ये किमान बेड रोलवरून भांडण होणार नाही. कारण- रेल्वे बोर्डाने या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने कोणता निर्णय घेतला आहे?
अलीकडेच रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सर्व विभागीय रेल्वे आणि आयआरसीटीसीच्या सीएमडींना एक पत्र पाठवण्यात आले आहे; ज्यात आरएसी प्रवाशांना स्वतंत्र बेड रोलही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे, “सखोल तपासणीनंतर एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या आरएसी तिकीटधारक प्रवाशांना (एसी चेअर कार वगळता) आता ब्लँकेट, बेडशीट व टॉवेलसह उशी असा संपूर्ण बेड रोल किट देण्यात येईल.”
असा निर्णय का घेण्यात आला?
रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एसी क्लासच्या प्रवासासाठी मानक आवश्यकतांनुसार, आरएसी प्रवाशांकडून वसूल केलेल्या भाड्यात बेडरोल किटचे शुल्कही घेतले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आरएसी प्रवाशांना संपूर्ण बेडरोल किटची तरतूद सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरएसी प्रवाशांना कन्फर्म तिकिटांवर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या बरोबरीने वागणूक देणे, तसेच या प्रवाशांना चांगला आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरएसी सीट म्हणजे काय?
आरएसी तिकीट बुकिंगमध्ये दोन प्रवाशांना एकच साइड लोअर बर्थ दिला जातो आणि कोणता बर्थ रिक्त राहिला, तर त्यांचा बर्थ निश्चित होईल या अपेक्षेने हे तिकीट दिले जाते. परंतु, ते शक्य न झाल्यास दोन्ही प्रवाशांना एक साइड लोअर बर्थ ‘मॅनेज’ करून प्रवास करावा लागतो.
आरएसीच्या संख्येत वाढ
दरम्यान, प्रवाशांची गर्दी पाहता, काही वर्षांपासून सर्व ट्रेन्समध्ये आरएसी सीट किंवा बर्थची संख्या वाढवण्यात आली आहे. ट्रेनच्या प्रत्येक एसी 3 कोचमध्ये, आरएसीसाठी दोन बाजूंचे बर्थ चिन्हांकित केले गेले होते. म्हणजे चार आरएसी प्रवासी बसू शकतील. आता साइड बर्थची संख्या चार करण्यात आली आहे. म्हणजे एसी-३ कोचमध्ये आठ आरएसी प्रवासी असतात. त्याचप्रमाणे एसी-२ मधील पहिले दोन बर्थ आरएसीसाठी होते. आता ती संख्या वाढवून तीन करण्यात आली आहेम्हणजे सहा आरएसी प्रवासी प्रवास करू शकतात. स्लीपर क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये आरएसी साठी सात बाजूंचे बर्थ चिन्हांकित आहेत. म्हणजे एका डब्यात १४ आरएसी प्रवासी प्रवास करू शकतात. यापूर्वी त्यात १० आरएसी प्रवासी प्रवास करू शकत होते.
बेड रोलमध्ये काय असते?
रेल्वेच्या एसी डब्यात रेल्वेकडून बेड रोल उपलब्ध करून दिला जातो. बेड रोलच्या पॅकमध्ये दोन स्वच्छ बेडशीट्स, एक स्वच्छ उशी व उशीचे कव्हर, छोटा टॉवेल आणि एक ब्लँकेट असते. या बेड रोलमध्ये दोन चादरी देण्यात आल्या आहेत; जेणेकरून एक चादर ते बर्थवर पसरवू शकतात आणि दुसरी चादर ब्लँकेटबरोबर पांघरूण म्हणून वापरता येते.