भारतीय रेल्वेमध्ये दोन प्रकारची इंजिने वापरली जातात. पहिले इलेक्ट्रिक आणि दुसरे डिझेल इंजिन; काही विशेष प्रसंगी एस्टी इंजिनदेखील वापरले जाते. भारतीय रेल्वेच्या सर्वांत शक्तिशाली इंजिनाबद्दल बोलायचे झाले, तर ते मालगाड्या ओढण्यासाठी वापरले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे मालगाडी हजारो टन मालाची वाहतूक करते. या इंजिनाच्या साह्याने हजारो टन माल वाहून नेला जातो. या ट्रेनचे वजन सामान्य ट्रेनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त असते. अशा परिस्थितीत या ट्रेनसाठी अतिशय शक्तिशाली इंजिनाची आवश्यकता असते. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आता सर्वांत शक्तिशाली इलेक्ट्रिक इंजिन दाखल झाले आहे.
‘VAG 12B’ नावाचे हे १२,००० अश्वशक्ती (HP) विजेवर चालणारे इंजिन हे देशातील सर्वांत शक्तिशाली स्वदेशी इंजिन आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने नुकताच या इलेक्ट्रिक इंजिनचा व्हिडीओ शेअर करत त्याला ‘बीस्ट ऑफ इंडियन रेल्वे’ असे म्हटले आहे. रेल्वेच्या या कामगिरीचे आता खूप कौतुक होत आहे.
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत तयार केलेले हे इलेक्ट्रिक इंजिन जड मालगाड्यांना १२० किमी प्रतितास या वेगाने सहा हजार टनांपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. हे इंजिन WAG-9 पेक्षा दुप्पट शक्तिशाली आहे.
“बीस्ट ऑफ इंडियन रेल्वे”
रेल्वे मंत्रालयाने एक्सवर शेअर केलेल्या इंजिनाच्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, WAG-12B इंजिन डबल डेकर मालगाडी खेचत आहे; जे अगदी सहजतेने जात आहे. यातून इंजिनाची मजबूत रचना आणि क्षमता दिसून येत आहे.
WAG 12B हे इंजिन इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर किंवा IGBT-आधारित प्रोपल्शन तंत्रज्ञानाने बनवलेले आहे आणि यात रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर करण्यात आला आहे; ज्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो. हे इंजिन २२.५ टन एक्सल लोडसह बो-बो डिझाइनसह पुनर्निर्मित केले गेले आहे; ज्याची क्षमता २५ टनांपर्यंत वाढवता येऊ शकते. ते देशातील मालगाड्यांचा सरासरी वेग किमान २०-२५ किमी प्रतितास वाढवेल, अशी अपेक्षा आहे. हे इंजिन भारतीय लोहमार्गावर धावणाऱ्या मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग आणि मालवाहू क्षमता वाढवू शकते. त्यामुळे साहजिकच लोहमार्गावरील गर्दी कमी करण्यास मदत मिळू शकेल.
व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरने लिहिले की, ‘पॉवर ऑन द ट्रॅक, भारतीय रेल्वेचा बीस्ट, Wag12B – भारतातील सर्वांत शक्तिशाली इलेक्ट्रिक इंजिन सादर करीत आहे. खरा अभियांत्रिकी चमत्कार आणि रेल्वेची तंत्रज्ञान क्षेत्रातील एक झेप. दुसर्याने लिहिलेय, भारतीय रेल्वेने इतक्या मोठ्याप्रमाणाक कंटेनर वाहून नेलेले कधीही पाहिले नाही… आश्चर्यकारक!