Indian Railway Shocking Video : सोशल मीडियावर भारतीय रेल्वेसंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; जे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सध्या भारतीय रेल्वेमधील असाच एक धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. त्यात एक पोलीस अधिकारी एका महिलेबरोबर असे काही कृत्य करतोय की, जे पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी व्हिडीओतील पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांचे अनेकदा क्षुल्लक कारणावरून वाद होतात. कित्येकदा या वादाचे रूपांतर हाणामारीत होते. अशाच प्रकारे एका ट्रेनमध्ये काही कारणावरून वाद झाला यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेनमध्ये भरप्रवाशांसमोर चक्क एका महिलेच्या कानशिलात लगावल्या. धक्कादायक म्हणजे हा पोलीस अधिकारी तिथेच थांबला नाही, तर त्याने महिलेला चक्क लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिसांचे काम जनतेची सेवा करणे, त्यांना अडचणीच्या वेळी मदत करणे हे आहे. त्यासाठी त्यांना विशेष अधिकार दिले जातात. मात्र, काही मुजोर आणि वर्दीचा माज करणारे अधिकारी पदाचा गैरवापर करताना दिसतात. जनतेची सेवा राहिली दूर; पण ते गरज नसतानाही कायदा हातात घेताना दिसतात. या व्हिडीओतही असाच काहीसा प्रकार दिसून येतोय.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, वर्दीतील एक पोलीस अधिकारी धावत्या ट्रेनमध्ये चक्क एका महिलेवर हात उचलताना दिसतोय. भरप्रवाशांसमोर तो महिलेच्या कानशिलात लगावत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतोय. तो त्या महिलेला इतका निर्दयतेने मारतोय की, ते पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. यावेळी बाजूला उभे असलेले लोक हात जोडून त्यांना न मारण्याची विनंती करतात. पण, तो पोलीस अधिकारी कोणाचेही न ऐकता सरळ महिलेवर हात उगारतो. यावेळी एक प्रवाशाने दूरवरून सर्व घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी व्हिडीओतील दृश्य पाहून लोकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही १४ जानेवारी २०२५ रोजी रणथंबोर एक्स्प्रेसमध्ये घडली. त्याचे घडले असे की, कोणीतरी अचानक ट्रेनची साखळी खेचून ट्रेन थांबवली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आरपीएफ कॉन्स्टेबल ओम प्रकाश ट्रेनच्या एका कोचमध्ये शिरले. यादरम्यान ट्रेन थांबवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना काही प्रवाशांबरोबर त्यांचा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात त्यांनी चक्क एका महिलेच्या कानशिलात लगावली. यावेळी काहींना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण ते महिलेला चक्क लाथा-बुक्क्यांनी मारू लागले.
पोलिसांची ही गुंडगिरी पाहून लोक चांगलेच संतापले आहेत, अनेकांनी या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत राजस्थान पोलीस प्रशासनाने पोलीस अधिकारी ओम प्रकाश यांना नोकरीवरून सस्पेंड केलं आहे.
या घटनेचा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करीत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “बडतर्फीनंतर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करावी, निलंबनाने काहीही होणार नाही आणि नंतर पुन्हा कामावर घेतले जाईल.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अशा लोकांनीच पोलीस खात्याची बदनामी केली आहे. मला कळत नाही की, त्यांना एवढा माज का असतो.”