Indian Railway Unhealthy Food Video : भारतीय रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक जण ट्रेनचा पर्याय निवडतात. या प्रवासादरम्यान प्रवाश्यांसाठी सकाळच्या चहा नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या सर्व सुविधा दिल्या जातात. अनेक जण या सुविधेचा लाभ घेताना दिसतात. पण, ट्रेनमधील अन्नपदार्थांपासून प्रवाशांनी जपून राहणे हिताचे आहे, कारण सोशल मीडियावर ट्रेनमधील जेवणासंदर्भात असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. तसेच ट्रेनमधील जेवण विकत घेऊन खाताना तुम्ही हजार वेळा विचार कराल. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळं

दिल्लीतील एका प्रवाशाने ट्रेनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे, अर्यांश सिंह असं या प्रवाशाचे नाव आहे. या प्रवाशाने IRCTC VIP Executive Lounge मधून प्रवास करत असताना जेवण ऑर्डर केले होते, पण या जेवणातील एका पदार्थात त्याला चक्क जिवंत गोम आढळून आली, जी पाहून तो तर घाबरलाच, पण त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच युजर्सदेखील हैराण झाले. रेल्वे प्रशासन अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळतयं, म्हणत याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे.

रेल्वेतील जेवणातील पदार्थात तरंगतेय गोम

युजरने रेल्वेतील रायत्याचा फोटो काढला आहे, ज्यात एक जिवंत गोम तरंगताना दिसते आहे. या फोटोसह त्याने “रेल्वेच्या खाण्याची गुणवत्ता मागील काही वर्षांमध्ये खरंच फार बदललीये”, असा टोलाही लगावला आहे. “हो, अगदीच रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदर्थांचा दर्जा सुधारतोय. आता ते प्रोटीनयुक्त रायता देऊ लागलेयत”, असा टोला त्याने लगावला. हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्यांशने आपल्या पोस्टमध्ये तपशीलवार स्पष्टीकरण दिले. प्रवशाबरोबर IRCTC VIP Executive Lounge मध्ये घडलेल्या या घटनेनंतर त्याने लगेचच इतर प्रवाशांना याबाबत माहिती दिली. पण, धक्कादायक बाब म्हणजे कोणीच त्याला गांभीर्याने घेतले नाही.

एका युजरने लिहिले, जर व्हीआयपी लाउंजमध्ये असे होऊ शकते, तर सामान्य ट्रेनमध्ये काय स्थिती असेल याची कल्पना करा. अनेकांनी याला अत्यंत घृणास्पद म्हटले, तर काहींनी आर्यांशला या प्रकरणाबाबत अधिकृत तक्रार दाखल करण्याची विनंती केली.