Indian Railways Viral Video : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतुकीची सेवा मानली जाते. यातून रोज लाखो लोक प्रवास करतात. कमी पैशात कमी वेळेत प्रवास करण्यासाठी प्रवासी रेल्वे सेवेचा वापर करतात. विशेषत: मुंबईसारख्या शहराचे आर्थिक गणित या रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. पण, अनेक जण या सेवेचा गैरवापर करताना दिसतात. रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे, मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना दिसतात. अशा प्रवाशांसाठी अनेक कायदे, नियम आहेत; मात्र तरीही कसलीही भीती न बाळगता प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. यात गेल्या काही दिवसांपासून अनेक आरक्षित ट्रेन्समध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरोधात आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, ज्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्हीदेखील लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनने विनातिकीट प्रवास करत असाल तर सावध व्हा.
अलीकडेच एका ट्रेनच्या एसी कोचमध्ये २१ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले. आरपीएफने या सर्व २१ प्रवाशांना ताब्यात घेतले. सध्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
निरीक्षक अरविंद कुमार सिंह यांनी वाणिज्य विभागाच्या मुख्य वाहतूक निरीक्षकांच्या पथकासह भागलपूर दानापूर इंटरसिटी एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १३४०२ मध्ये नियमित तपासणी सुरू केली, यावेळी एसी कोचमधून तिकीट नसलेले २१ प्रवासी पकडले गेले. किउल स्थानकात नियमित तपासणीदरम्यान ही घटना घडली.
आरोपींवर कारवाई?
तपासादरम्यान त्या २१ प्रवाशांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) चे प्रभारी निरीक्षक अरविंद कुमार सिंह यांनी त्यांची संपूर्ण टीम आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह (TTE) कारवाई केली. यावेळी अटक करण्यात आलेल्या २१ प्रवाशांकडून प्रत्येकी हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
घटनेच्या वेळेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर लोक सतत वेळवेगळ्या कमेंट करत आहेत. रेल्वेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा रेल्वेशी संबंधित व्हिडीओ लोकांसमोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रेनच्या एसी कोचमधील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यावर लोकांनी आपल्या समस्या उघडपणे मांडल्या होत्या. हा व्हिडीओ अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोकांनी सतर्क होत, भविष्यात विनातिकीट ट्रेनमध्ये चढू नये.