Rats Damage Suitcase In Trains : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यासाठी रेल्वेकडूनही प्रवाशांना विविध सुविधा दिल्या जातात. त्यात भारतीय रेल्वेतील फर्स्ट एसी कोच हा प्रवासासाठी सर्वांत सुरक्षित मानला जातो. त्याचे भाडेही इतर कोचच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असते. मात्र, एवढे पैसे भरूनही प्रवाशांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागते. अशा प्रकारे फर्स्ट क्लास एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. या प्रवाशांच्या महागड्या बॅगा उंदरांनी अक्षरश: कुरतडल्या. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
१९ मे रोजी जनेश्वरी एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधील प्रवाशांच्या बॅगा उंदरांनी कुरडतल्या होत्या.
प्रवाशांच्या महागड्या सुटकेसची उंदरांकडून दुर्दशा
@RailMinIndia @RailwaySeva @Central_Railway @PMOIndia
— ✨CG✨ (@CG_bharatiya) May 21, 2024
Train 12102 Departed on 19th May Coach H1 Seat A-2.
PNR
6535087042.
Suitcases damaged by rodents.
Trying to the TC for half hour to lodge complaint. pic.twitter.com/EfeX39EYI4
कोलकाताहून मुंबईला जाणाऱ्या जनेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने सोशल मीडिया अकाउंटवर उंदरांनी कुरतडलेल्या बॅगांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तुम्ही पाहू शकता की, उंदरानी प्रवाशांच्या लाल आणि निळा रंगाच्या महागड्या बॅगा अक्षरश: कुरतडून टाकल्या आहेत. सीटखाली ठेवलेल्या या बॅगांची उंदरांनी नासधूस केली. उंदरांनी कुरतडलेल्या बॅगांचे फोटो, व्हिडीओ शेअर करीत प्रवाशाने लिहिले की, तक्रार नोंदविण्यासाठी मी अर्धा तास टीसीकडे प्रयत्न करीत होतो.
प्रवाशाच्या या ट्विटरवर भारतीय रेल्वे, रेल्वे सेवेच्या अधिकृत हॅण्डलवरून एक उत्तर देण्यात आले. रेल्वे सेवेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवर लिहिले होते की, आम्ही हे ऐकून काळजीत आहोत आणि लवकरात लवकर मदत करू. आम्हाला तुमचा मोबाईल नंबर लागेल. तुम्ही तुमची समस्या railmandad.indianrailways.gov.in वर पाठवू शकता किंवा तक्रार निराकरणासाठी १३९ डायल करू शकता.
ट्रेनमधील हे व्हिडीओ आणि फोटो @mumbaimatterz नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत; जे आता खूप व्हायरल होत आहेत. या प्रकरणानंतर अनेकांनी भारतीय रेल्वेवर टीका केली आहे. रेल्वेने या प्रकरणी प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यावर अनेकांनी रेल्वेतून प्रवास करताना आलेले अनुभव शेअर केले आहेत.
भारतीय रेल्वेकडून दरवर्षी उंदरांचा नायनाट करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, उंदरांचा उद्रेक कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतोय. आता तर चक्क ट्रेनच्या एसी कोचमध्येही उंदरांचा सुळसुळाट दिसून आला आहे. त्यामुळे प्रवास करताना महागड्या बॅगांचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई कोण देणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.