Train Seat Desi Jugaad Video : आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची कमतरता नाही, जे त्यांच्या रोजच्या अडचणींवर मात करण्यासाठी जुगाड करतात आणि त्यात यशस्वीदेखील होतात. हे लोक काही वेळा असे काही जुगाड शोधून काढतात की, ते पाहून विश्वास बसत नाही. अनेकदा अशा जुगाडांमुळे वेळ, पैसा आणि श्रमाचीदेखील बचत होते. सध्या ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने तरुणाने बसण्यासाठी केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेच्या अनेक ट्रेन्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दिवाळी संपली; पण ‘छठ’ बाकी आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने जादा गाड्याही सोडल्या आहेत. मात्र तरीही जनरल कोचमधील गर्दी लक्षात घेता, एका प्रवाशाने आरामात बसण्यासाठी एक आश्चर्यकारक आणि भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. या जुगाडामुळे त्याला प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्येही बसण्यासाठी एक विशेष आणि ऐसपैस अशी जागा उपलब्ध झाली.
सीट बनवण्यासाठी दोरीचा केला ‘असा’ ‘वापर
व्हिडीओमध्ये एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये दोन अप्पर सीट्सच्या मधील जागेत दोरीच्या साह्याने एक खाट तयार केल्याचे दिसत आहे. त्यावर तो फक्त बसूनच नाही, तर झोपून आरामात प्रवास करू शकतो. त्यामुळे बसण्यासाठी सीट मिळो ना मिळो; पण या जुगाडामुळे तो कुठेही गेला तरी आपली सीट स्वत: तयार करून प्रवास करू शकतो.
असा अनोखा जुगाड व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका रेल्वेच्या डब्यात गर्दी आहे. काही प्रवासी उभे राहून प्रवास करतायत. यात काही प्रवासी सीट्सवर तर काही अप्पर बर्थवर प्रवासी आरामात झोपले आहेत. दोन अप्पर बर्थच्या मधल्या जागेत एक व्यक्ती दोरीद्वारे खाट तयार करताना दिसत आहे. बर्थच्या टोकाला असलेल्या लोखंडाच्या मदतीने तो दोरीने एक बेड तयार करताना दिसतो; जो जवळजवळ पूर्ण झाला आहे. यावेळी काही प्रवाशांनी त्या व्यक्तीचा जुगाड आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला; जो पाहून अनेक जण अवाक् झालेत. असा अनोखा जुगाड तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहिला असावा.
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
ट्रेनमधील हा भन्नाट जुगाड व्हिडीओ @MANJULtoons नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मंत्रिमहोदयांनी सात हजार गाड्या सोडल्या आहेत आणि प्रवाशांना आश्वासन देऊन बर्थची संख्या वाढवली आहे. आता कुठेही अडचण नाही. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, आपल्या देशातील रेल्वे प्रवासी अतिशय तेजस्वी आहेत. तसेच, खूप क्रिएटिव्ह आणि हुशार आहेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, बिचारा करेल तरी काय तिकीटच इतकी जास्त आहे. तिसऱ्या एकाने लिहिले की, व्वा! काय जुगाड आहे, कमाल आहे.