Indian Railways Viral Video : भारतीय रेल्वेतील खाद्यपदार्थांबाबत सातत्याने अनेक तक्रारी येत असतात. यातील काही तक्रारी खाद्यपदार्थांच्या अतिरिक्त किमतींबाबत असतात. अनेक प्रवासी सोशल मीडियावर भारतीय रेल्वे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना टॅग करत या तक्रारी मांडताना दिसतात. याशिवाय काही प्रवासी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ कॉल करून तक्रारी नोंदवताना दिसतात. अशाच प्रकारे एका प्रवाशाने १३९ वर कॉल करत ट्रेनमधील पाण्याच्या बाटलीवर किमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई तर केलीच, शिवाय कॅटरिंग कंपनीलाही मोठा दंड ठोठावला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही संपूर्ण घटना ट्रेन क्रमांक १२४१४ पूजा सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमधील कोचमधून आहे. १२ नोव्हेंबर रोजी या ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान कॅटरिंग स्टाफमधील एक कर्मचारी पाण्याची बाटली घेऊन आला आणि ती बाटली तो २० रुपयांना विकत होता. यावेळी प्रवाशांनी स्टाफ मेंबरला १५ रुपयांची बाटली २० रुपयांना का विकतो अशी विचारणा केली तेव्हा तो म्हणाला की, “आम्हालाही पाच रुपये हवे आहेत. आम्ही ट्रेनमध्ये फिरतो.” यावेळी ट्रेनमधील एका प्रवाश्याने त्यांचे संपूर्ण बोलणे आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर एका प्रवाशाने १३९ वर कॉल करून याबाबत तक्रार केली, ज्यानंतर लगेचच कारवाई झाली. या घटनेनंतर काही वेळाने संबंधित कर्मचाऱ्याबरोबरचा एक कर्मचारी त्या त्या प्रवाशांजवळ आला आणि त्याने पाण्याच्या बाटल्यांवर घेतलेली अतिरिक्त रक्कम त्यांना रक्कम परत करू लागला.
ठोठावला एक लाखाचा दंड
रेल्वेने एक्सवर या घटनेची माहिती देताना लिहिले आहे की, १३९ वर ओव्हरचार्जिंगची तक्रार आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. याप्रकरणी केटरिंग कंपनीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेसंबंधीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
ट्रेनमधील खाद्यपदार्थांसाठी घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक युजर्सनी कमेंटमध्ये तक्रारी केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, देशभरातील प्रत्येक ट्रेनमध्ये जादा चार्ज घेतला जातो. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, गोरखपूर ते प्रयागराज वंदे भारत ट्रेनच्या कॅटरिंग कंपनीचीदेखील चौकशी करण्यात यावी. कारण- या ट्रेनमधील जेवणाचा दर्जाही खराब असतो. अशा प्रकारे अनेक युजर्सनी खाद्यपदार्थांच्या बिलांबाबत मते व्यक्त केली आहेत. स्थानकावर उपस्थित असलेल्या विक्रेत्यांचे बिल मशीन नेहमीच नादुरुस्त असते आणि त्यामुळे ग्राहकांना ते कधीच बिल देत नाहीत, अशी तक्रार युजर्सनी केली आहे.