Indian Railways Viral Video : भारतीय रेल्वे हे देशभरातील लोकांसाठी वाहतुकीचे सर्वांत सोईचे, आरामदायी साधन आहे. त्यामुळे दररोज करोडो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. अनेक जण सुटीनिमित्त कामानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यात लांबचा प्रवास असल्यास अनेक जण स्लीपर कोचची तिकिटे बुक करतात; जेणेकरून आरामात झोपून प्रवास करता येईल. पण तुम्हीही ट्रेनमध्ये अशा प्रकारे आरामात झोपून प्रवास करत असाल, तर यापुढे जरा काळजी घ्या. कारण- सोशल मीडियावर सध्या भारतीय रेल्वेतील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चोर झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून खुलेआमपणे मोबाईल लंपास करताना दिसतोय.
तुम्ही भारतीय रेल्वेने कधी प्रवास केला असेल, तर तुम्ही पाहिले असेल की, अनेक जण शर्टच्या खिशात मोबाईल किंवा पैशांचे पाकीट ठेवून आरामात झोप काढत असतात. ट्रेनमध्ये अनेकदा घोषणा होत असतात, “प्रवाशांनो कृपया लक्ष द्या… प्रवाशांनी त्यांचे सामान स्वत:कडे सुरक्षित ठेवावे.” पण या घोषणेकडे दुर्लक्ष करून प्रवासी आरामात झोप काढतात. याच संधीचा गैरफायदा घेत चोर हात साफ करताना दिसतात.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या स्लीपर कोचमधील एका कंपार्टमेंटमधील अप्पर कोचवर एक व्यक्ती आरामात झोप काढतेय. त्याने मोबाईल पँटच्या खिशात ठेवलाय. यावेळी मास्क लावून एक चोर त्याच्या सीटजवळ येतो आणि आजूबाजूला पाहून, त्याच्या खिशातील मोबाईल लंपास करून निघून जातो. आपल्या खिशातून कोणी मोबाईल काढून घेऊन गेलंय हेदेखील त्या व्यक्तीला कळत नाही, इतका तो गाढ झोपलाय. पण तुम्हीही अशा प्रकारे ट्रेनमध्ये गाढ झोपेत असाल तर जरा सावध. कारण- तुमचेही असे नुकसान होऊ शकते.\
ट्रेनमधील हा धक्कादायक व्हिडीओ @tripath1526 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे; तर अनेकांनी ट्रेनमधून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.