मुंबईतील घाटकोपरमध्ये (पश्चिम) एक महाकाय अजगर सापडल्याची घटना समोर आली आहे. येथील एका १३ मजली बांधकामाधीन टॉवरच्या छतावर हा ४ फूट लांबीचा सापडला आहे. सोसायटी परिसरात अजगर सापडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला सुरक्षित रेस्क्यू केले आहे. इंडियन रॉक जातीचा हा अजगर इतक्या उंचावर पोहोचला कसा याबाबत आता
स्थानिक रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मुंबईतील एका आयटी फर्मसाठी काम करणारे प्राणीमित्र सूरज शाहा यांना घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस रोडवरील व्रज पॅराडाइज बिल्डिंगच्या छतावर इंडियन रॉक जातीचा अजगर दिसला. इमारतीच्या गच्चीवर बांधाकाम सुरु असल्याने तो अजगर पूर्णपणे सिमेंटमध्ये फसला होता. अजगराला अशा स्थितीत पाहून त्याला वाचवता यावे म्हणून सूरज शाहा यांनी लगेच वनविभागाला संपर्क साधून माहिती दिली.
अजगराला सुरक्षित बाहेर काढून वाचवण्यासाठी मुंबई परिक्षेत्राचे वन अधिकारी राकेश भोईर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले.
इंडियन रॉक अजगर ही संरक्षित वन्यजीव प्रजाती आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. सुदैवाने, ज्या लोकांनी अजगर पाहिला त्यांनी त्याला कोणतीही हानी पोहचवली नाही, यातून लोकांमध्ये वन्यजीव संरक्षणाचे महत्व वाढत असल्याचे दिसत आहे, असे शाहा यांनी म्हणत कौतुक केले.
तसेच सापांना इजा करणे किंवा मारणे बेकायदेशीर असून पर्यावरण संतुलनासाठी या प्राण्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी यातून केले.
वन्यजीव तज्ञांनी सांगितले की, मुसळधार पावसात अजगर आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. ज्यामुळे ते अनेकदा उंच ठिकाणांचा शोध घेतात. अशा परिस्थितीत ते आसरा शोधण्यासाठी घरांमध्ये किंवा इमारतींच्या छतापर्यंत जाऊन पोहोचतात. यात इंडियन रॉक अजगराची प्रजाती कितीही उंचावर सहज पोहचू शकते. या प्रजातीच्या अजगरांना उत्कृष्ट गिर्यारोहक म्हणूनही ओळखले जाते. जे झाडांवर आणि अगदी खडकाळ पृष्टभागावर सहज चढू शकतात.