पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची अलीकडेच काहीजणांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. सध्याच्या घडीला सिद्धू मूसेवाला या जगात नसला तरी त्याची गाणी सीमेपलिकडे पाकिस्तानातदेखील ऐकली जात आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानी सैन्यांनी सीमेपलिकडे सिद्धू मूसेवालाचं गाण स्पीकरवर लावलं लावल्यानंतर, त्या गाण्यावर भारतीय जवान थिरकले आहेत.
सीमेवरील हा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. भारतीय पोलीस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटरवर हा शेअर केला आहे. आपण लावलेल्या गाण्यावर भारतीय जवान नाचत आहेत, हेही एका पाकिस्तानी सैन्याने पाहिलं आहे. भारतीय जवानांच्या डान्स पाहून त्याने हातवारे करत दाद दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडीओ क्लिपमध्ये पाकिस्तानी सैनिक स्पीकरवर मूसवालाचे ‘बंबीहा बोले’ हे गाणं वाजवताना दिसत आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान गाण्याचा आनंद लुटत आहेत. संबंधित गाण्यावर भारतीय जवानांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारत-पाकिस्तानसीमेवरील एका सीमा चौकीवर रेकॉर्ड करण्यात आल्याचं दिसतं. ज्याठिकाणी स्पीकर लावला आहे, तिथे पाकिस्तानी झेंडादेखील दिसत आहे.