जगातील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा जिंकून देशाच्या सुपुत्राने जगात भारताचा डंका वाजवला आहे. दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (आयआयटी) विद्यार्थी कलश गुप्ता याने जगातील सर्वात मोठ्या कोडिंग स्पर्धेत भाग घेत जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. कलशला ‘TCS CodeVita’ पर्व दहाचा विजेता घोषित करण्यात आला आहे. जिंकल्यावर, कलश गुप्ताला USD १०,००० ची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे, असे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कलश हा आयआयटी दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेत ८७ देशांतील समारे एक लाखाहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. जगातील टॉप कोडर्सच्या यादीत विविध विद्यापीठांतील २१ भारतीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. कलश व्यतिरिक्त, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणारे स्पर्धक अनुक्रमे चिली आणि तैवानचे होते. स्पर्धा जिंकल्यानंतर गुप्ता यांचा आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आणखी वाचा : अबब! तब्बल ६२ लाखांना विकली गेली ही जुनी जीन्स; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर
जिंकल्यानंतर काय म्हणाले कलश गुप्ता?
जिंकल्यानंतर कलश गुप्ता म्हणाले की, मला कधीच वाटले नव्हते की मी देखील अव्वल तीनमध्ये येऊ शकतो, परंतु हा एक अतिशय आश्चर्यकारक अनुभव आहे. सुरुवातीला, समस्या सोडवण्यास मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, पण जसजशी मी प्रगती करत गेलो, इतर काही समस्या सोडवत गेलो, तसतसे माझ्या अंतिम स्थानावर माझा आत्मविश्वास वाढला आणि मला खात्री होती की मी अव्वल तीन मध्ये नक्की येईन.