भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. भारताने यजमान इंग्लंडचा पराभव करत स्पर्धेची झोकात सुरुवात केली. फलंदाजांची दमदार कामगिरी आणि त्यांना गोलंदाजांची लाभलेली साथ यांच्यामुळे भारताने इंग्लंडचा पराभव केला. मात्र यावेळी अनेकांना भारतीय कर्णधार मिताली राजच्या कूल अंदाजाचे दर्शन घडले. मिताली राजची एक कृती सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे सामन्यानंतरही ‘तो’ किस्सा सर्वत्र व्हायरल झाला.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावांचा डोंगर उभा केला. पुनम राऊत आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी १४४ धावांची भागिदारी रचत भारतीय डावाचा मजबूत पाया रचला. भारताची सलामीची जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत असताना कर्णधार मिताली राज अगदी आरामात सीमारेषेजवळ पुस्तक वाचत बसली होती. यावेळी अनेकदा मिताली राजकडे कॅमेरा वळला. त्यामुळे पुस्तक वाचत बसलेली मिताली मैदानावरील आणि मैदानाबाहेरील प्रेक्षकांना दिसली. मिताली राजच्या ‘थंड’पणाचे अनेकांना कौतुक वाटले.
#MithaliRaj – Queen of #WWC17 pic.twitter.com/F8GvP5oZJa
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 24, 2017
भारताला पहिला धक्का बसल्यावर मिताली राज मैदानात उतरली. सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करुन दिल्याने त्यावर कळस चढवण्याची जबाबदारी मिताली राजकडे होती. मितालीने ७१ धावांची खेळी साकारत संघाला पावणे तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने इंग्लिश खेळाडूंना बाद करत सामना ३५ धावांनी खिशात घातला. मात्र फलंदाजीला जाण्याआधी मिताली इतकी थंड कशी काय असू शकते, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. खुद्द आयसीसीनेदेखील मिताली राजच्या या थंडपणाचे कौतुक करत ट्विट केले. चाहत्यांना पडलेल्या या प्रश्नाला मिताली राजने ट्विटरवर उत्तर दिले. ‘आजूबाजूचे वातावरण वाचनासाठी अगदी योग्य होते,’ असे मितालीने ट्विटमध्ये म्हटले.
Well it was a perfect weather for a relaxing read. https://t.co/7IcOTOViob
— Mithali Raj (@M_Raj03) June 24, 2017
सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मितालीने या सामन्यात नोंदवला. मितालीने तिच्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४७ व्या अर्धशतकाची नोंद केली. आतापर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूला ही कामगिरी करता आलेली नाही. यासोबतच मितालीची एकदिवसीय सामन्यांमधील सरासरी ५२.२७ इतकी आहे. १०० हून अधिक सामने खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंमध्ये मितालीची सरासरी सर्वाधिक आहे.